शाळेतील विद्यार्थ्यांची यादी जातीसह जाहीर !! साताऱ्यातील निर्मला कॉन्व्हेंट स्कूलमधील संतापजनक प्रकार !!
सातारा-पोलीस नायक (वृत्तसेवा) :_
दि.२१ मे २४ मंगळवार
शाळेच्या तुकड्या करतांना विद्यार्थ्यांच्या जातीसह याद्या प्रसिद्ध करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार साताऱ्यातील निर्मला कॉन्व्हेंट स्कूलमध्ये नुकताच उघडकीस आला असून यानंतर शाळेच्या निषेधार्थ विविध संघटनांसह पालकांनी आंदोलन केले आहे.याबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.साताऱ्यातील निर्मला कॉन्व्हेंट स्कूल या मिशनरी शाळेकडून नवीन वर्षाच्या तुकड्या करतांना विद्यार्थ्यांचा जातीसह उल्लेख करून याद्या पालकांना पाठवण्यात आल्या असून हि बाब उघडकीस येताच पालक संतप्त झाले.परिणामी याचा सर्व स्तरांवरून निषेध सुरू होत पडसाद उमटू लागले आहेत.हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या असून त्यांनी बंद शाळेच्या फाटकाला निषेधाचे पत्र लावत आंदोलन केले आहे.
या प्रकाराची सखोल चौकशी करण्याची मागणी करत सातारकर संतप्त झाले असून काल दि.२० मे सोमवार रोजी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना निवेदन देण्यात आले.सर्वत्र निषेध केला जात असतांना शाळेकडून अद्याप कोणताही खुलासा न आल्याने संताप वाढला आहे.सकाळी हिंदुत्ववादी संघटना निर्मला स्कूलसमोर जमा होऊ लागताच शहर पोलिसांची कुमक तेथे पोहोचली.संतप्त लोक आंदोलनाच्या तयारीत असतांना पोलिसांनी त्यांना आचारसंहितेचे कारण देऊन रोखले.त्यावर कार्यकर्त्यांनी घोषणा देत शाळेच्या बंद गेटला ‘निषेधाचे पत्र’ डकवून संताप व्यक्त केला.हा प्रकार चुकून झाला आहे की धर्म परिवर्तन करण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो अशी बाब हिंदुत्ववादी संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणली.ही माहिती मिळताच जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनाही धक्का बसला व याची पूर्ण चौकशी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.भाजप,विश्व हिंदू परिषद,बजरंग दल,सजग पालक फाउंडेशन व काही शिक्षक संघटना या शाळेविरोधी आंदोलनात सहभागी झाल्या आहेत.