पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.२१ मे २४ मंगळवार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून यंदा बारावीचा निकाल ९३.३७ टक्के लागला आहे.यात सर्वाधिक ९७.५१ टक्के निकाल कोकण विभागाचा तर मुंबई विभागाचा सर्वांत कमी ९१.९५ टक्के निकाल लागला आहे.याबाबत राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला आहे.प्रसंगी मंडळाच्या सचिव अनुराधा ओक,माणिक बांगर यावेळी उपस्थित होते.यंदा बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २३ मार्च दरम्यान घेण्यात आली.यंदा राज्यातील १५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती त्यात विज्ञान शाखेसाठी सर्वाधिक सात लाख ६० हजार ४६ विद्यार्थी,कला शाखेसाठी तीन लाख ८१ हजार ९८२,वाणिज्य शाखेसाठी तीन लाख २९ हजार ९०५,व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी ३७ हजार २२६,आयटीआयसाठी चार हजार ७५० विद्यार्थ्यांचा समावेश आहे.सदरहू राज्यातील ३ हजार ३२० केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली.

यंदाच्या निकालात मुलांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण जास्त असून ९२.६० टक्के मुले तर ९५.४९ टक्के मुली उत्तीर्ण झालेल्या आहेत. यंदा निकाल वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.विद्यार्थी व पालकांना दुपारी एक वाजल्यापासून निकाल ऑनलाइन पाहता येईल.विद्यार्थ्यांना mahahsscboard.in,mahresult.nic.in या संकेतस्थळावरून निकाल पाहता येणार आहे.गोसावी म्हणाले की बारावीची सहा माध्यमांतील १५४ विषयांची परीक्षा घेण्यात आली.यात अंतर्गत परीक्षेचे गुण ऑनलाइन घेतल्यामुळे निकाल लवकर जाहीर होण्यास मदत झाली तसेच  गैरप्रकारांची संख्या घटली.राज्यस्तरावर २७१ भरारी पथके नेमण्यात आली होती तसेच जिल्हा स्तरावरही स्वतंत्र भरारी पथके नियुक्त करण्यात आली होती.