पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.२१ मे २४ मंगळवार

छत्रपती संभाजीनगर विभागातील एका विद्यार्थिनीला १०० टक्के गुण मिळाले असून १०० टक्के गुण मिळवलेली ही राज्यातील एकमेव विद्यार्थिनी आहे.या विद्यार्थिनीला प्रत्यक्ष परीक्षेत ५८२ आणि क्रीडा गुण १८ असे एकूण ६०० पैकी ६०० गुण मिळाले आहेत अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे.

राज्य मंडळाने आज बारावीचा निकाल जाहीर केला असून यंदा बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २३ मार्चदरम्यान घेण्यात आली.यंदा राज्यातील १५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती.राज्यातील ३ हजार ३२० केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली.शरद गोसावी म्हणाले की वाणिज्य शाखेच्या विद्यार्थिनीने १०० टक्के गुण मिळवणे कौतुकास्पद आहे.खेळात केलेली मेहनत आणि अभ्यासातील सातत्य याचा परिणाम तिच्या निकालात दिसत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.