-: संकलन :-

बाळासाहेब आढाळे,पोलीस नायक

मुख्य संपादक

नेपाळच्या रुपंदेही जिल्ह्यातील ‘लुंबिनी’ हे शाक्य राजकुमार सिद्धार्थ गौतम यांचे जन्मस्थान असल्याचे मानले जाते.सिद्धार्थ गौतमाला ज्ञान प्राप्तीनंतर बुद्धत्त्व प्राप्त झाले होते.

लुंबिनी गार्डन

नेपाळच्या रुपंदेही जिल्ह्यातील लुंबिनी हे शाक्य राजकुमार सिद्धार्थ गौतम यांचे जन्मस्थान मानले जाते.सिद्धार्थ गौतमाला ज्ञान प्राप्तीनंतर बुद्धत्त्व प्राप्त झाले.लुंबिनी संकुलात बुद्धाच्या आईला समर्पित असलेल्या प्रसिद्ध मायादेवी मंदिरासह अनेक पवित्र स्थळे आहेत.मंदिराला लागूनच एक पवित्र तलाव आहे.या तलावात मायादेवीने सिद्धार्थाला जन्म देण्यापूर्वी विधिवत स्नान केले होते असे मानले जाते.लुंबिनी बागेचे वर्णन बौद्ध साहित्यात प्रदिमोक्ष-वन (पापमुक्त जंगल) असे केले आहे.या बागेत सालची झाडे,सुंदर फुले,पक्षी होते.या बागेची निर्मिती कोलिया वंशाचा राजा अंजन याने त्याची राणी रूपादेवी किंवा रुम्मिंदेई हिच्यासाठी केली होती.मगधी भाषेत रूपादेवी किंवा रुम्मिंदेई या नावाचा उल्लेख “लुमिंडेई” असा करण्यात येतो त्यामुळे काही अभ्यासकांच्या मते या भागाला लुंबिनी असे संबोधण्यात येऊ लागले तर इतर काही अभ्यासकांच्या मते हे नाव सम्राट अशोकाने नंतर दिले होते.कोलिया वंश हा कपिलवस्तूच्या शाक्य कुळाशी वैवाहिक संबंधाने जोडला गेला होता आणि त्यांनी संयुक्तपणे बागेचे व्यवस्थापन केले.मायादेवी ही राजा अंजनाची कन्या होती तिचा विवाह शाक्य राजा शुद्धोदनाशी झाला होता.बौद्ध साहित्यानुसार लुंबिनी हे कपिलवस्तू (सध्याचे स्थान अनिश्चित),कुशीनगर (आधुनिक उत्तर प्रदेशातील) आणि वैशाली,पाटलीपुत्र,नालंदा आणि राजगृह (सर्व आजच्या बिहारमधील) मधून जाणाऱ्या प्राचीन व्यापारी मार्गावर स्थित होते.या मार्गावर उच्चभ्रू आणि सामान्य लोकांसाठी दुकाने,खानपाणाची ठिकाणे आणि विश्रामगृहे होती.

सिद्धार्थचा जन्म

बौद्ध पौराणिक कथेनुसार मायादेवी कपिलवस्तूहून देवदहाकडे जात असतांना त्यांना वाटेत लुंबिनीमधील साल झाडे लागली.या झाडांमधून जात असतांना त्यांना प्रसूती वेदना होऊ लागल्या.बाळ जन्माला आल्यानंतर असे म्हटले जाते की,बाळ मायादेवीच्या कुशीतून उडी मारून सात पावले चालले आणि हा त्याचा शेवटचा जन्म असेल आणि त्याचा पुनर्जन्म होणार नाही असेही जाहीर केले.शाक्य राजपुत्र सिद्धार्थ गौतमचा जन्म इसवी सन पूर्व ५६३ (काही परंपरेनुसार इसवी सन पूर्व ४८०) आहे.इसवी सन पूर्व ४८३ (किंवा इसवी सन पूर्व ४००) मध्ये ८० व्या वर्षी त्यांचे महानिर्वाण झाले असे मानले जाते.इ.स.पूर्व २४९ मध्ये सम्राट अशोकाने बुद्धाचा जन्म ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी स्तंभ उभारला. सिद्धार्थाच्या जन्म सोहळ्यात असित नावाच्या ब्राह्मणाने कपिलवस्तूला भेट दिली होती.सिद्धार्थाला पाहताच असिताने भविष्यवाणी केली होती. त्या भविष्यवाणीनुसार हा मुलगा एकतर महान राजचक्रवर्ती किंवा महान धर्मचक्रवर्ती होईल असे वर्तवण्यात आले याविषयी बौद्ध परंपरेत संदर्भ सापडतात.

गृहत्याग

सिद्धार्थचे वडील शुध्दोदन यांना सिद्धार्थाने राजा व्हावे असे वाटत होते म्हणूनच त्यांनी राजपुत्राला कोणत्याही दुःखाचा स्पर्श होऊ नये यासाठी काळजी घेतली होती.राजपुत्राचे पालनपोषण शाही राजवाड्यात सर्व सांसारिक सुखसोयी आणि ऐषोरामात झाले परंतु त्यामुळे राजपुत्राला कोणत्याही प्रकारचे समाधान लाभले नाही.एकदा राजपुत्राला एका प्रसंगी एक म्हातारा,एक आजारी व्यक्ती,एक मृत व्यक्ती आणि एक तपस्वी दिसला त्यामुळे राजपुत्राला अनेक प्रश्न पडले व याच प्रश्नांच्या उत्तराकरिता सिद्धार्थाने एका रात्री घर सोडले.त्यावेळी सिद्धार्थ २९ वर्षांचे होते. आपली पत्नी आणि नवजात मुलाला मागे सोडून सिद्धार्थ राजवाड्यातून बाहेर पडले आणि त्यावेळी फक्त त्याच्या विश्वासू सारथी चन्ना आणि घोडा कंथक त्याच्याबरोबर होते या घटनेला बौद्ध परंपरेत अनन्यसाधारण महत्त्व आहे.

आत्मज्ञान

वयाच्या ३५ व्या वर्षी सिद्धार्थ गौतम मगधचा राजा बिंबिसाराच्या प्रदेशात वसलेल्या गया शहराच्या बाहेरील बोधी वृक्षाखाली ध्यान करू लागले. वयाच्या ४९ व्या वर्षी सतत ध्यान केल्याने त्यांना ज्ञानप्राप्ती झाली यावेळी सिद्धार्थाला जगातील दुःखाचे कारण समजले असे म्हणतात.यानंतर सिद्धार्थ हे बुद्ध,प्रबुद्ध झाले.बोधगया हे आज चार महान बौद्ध तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे तर लुंबिनी हे बुद्धांचे जन्मस्थळ आहे.वाराणसीजवळील सारनाथ येथे भगवान बुद्धांनी आपल्या अनुयायांना पहिला उपदेश दिला होता.बुद्धाचे महानिर्वाण कुशीनगर येथे झाले.बुद्ध लुंबिनीशी खूप संलग्न होते.महापरिनिब्बन सुत्तानुसार त्यांच्या हयातीत अनेक प्रसंगी कपिलवस्तूसह त्यांनी या स्थळाला भेट दिली होती.महापरिनिर्वाणीच्या क्षणी त्यांनी आपल्या अनुयायांना इतर तीन पवित्र स्थळांसह लुंबिनीला भेट देण्याचा सल्ला दिला होता.

ऐतिहासिक स्थळ

लुंबिनी येथे इसवी सनपूर्व सहाव्या शतकातील अनेक पुरातत्त्वीय अवशेष सापडले आहे.चिनी भिक्षू फॅक्सियन (फ़ाहियान) आणि झुआनझांग (ह्युएन त्सांग) यांनी अनुक्रमे ५ व्या आणि ७ व्या शतकात या स्थळाला भेट दिली.१९ व्या शतकात लुंबिनीचा इतिहास शोधण्याच्या प्रयत्नात पुरातत्त्व अभ्यासकांनी या परिसरात सर्वेक्षण केले होते.लुंबिनी आणि बौद्ध धर्माच्या इतिहासातील इसवी सन पूर्व ३ रे शतक महत्त्वाचे होते. कलिंगाच्या युद्धातील नरसंहार पाहिल्यानंतर सम्राट अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारला आणि धर्माच्या प्रसारासाठी स्वतःला वचनबद्ध केले त्यांनी लुंबिनीला भेट दिली आणि इसवी सन २४९ मध्ये बुद्धाच्या जन्मस्थानावर एक धार्मिक वास्तू उभारली तसेच याच ठिकाणी स्तंभही उभारून त्यावर शिलालेखही कोरवून घेतला.लुंबिनीचा अशोक स्तंभ भग्न अवस्थेत आहे.शिल्लक स्तंभाच्या खालील भाग हा जमिनीच्या ४ मीटर आत आहे तर जमिनीवरील भाग ६ मीटर आहे.मूळ स्तंभ बराच उंच असल्याचे मत अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.प्रवासी वर्णनावरून मूळ स्तंभ कशास्वरुपाचा होता याची कल्पना येते.मूळ स्तंभाच्या शीर्षकावर उलटे कमळ आणि प्राण्याची प्रतिमा होती.स्तंभावरील शिलालेख,पाली भाषेत होता तर लेखाची लिपी ब्राह्मी होती.या कोरीव लेखात अशोकाने बुद्धाच्या जन्मस्थळी प्रार्थना केली आणि यात्रेकरूंना सर्व धार्मिक करांपासून मुक्त केले जाईल असे म्हटले आहे.१३१२ मध्ये खास-मल्ल राजा रिपू ​​मल्ल याने ‘ओम मणिपद्मे हूं’ (ॐ मणि पद्मे हूँ) हा बौद्ध मंत्र आणि स्तंभावर त्याचे नाव कोरले असे असले तरी १८९६ साली पुन्हा शोध लागेपर्यंत लुंबिनी अनेक शतके विस्मरणात गेले होते आणि याच ठिकाणी नंतर पुरातत्व अभ्यासकांनी उत्खनन केल्यावर अनेक गोष्टींचा शोध लागला.