“मुलांना फास्टफूडऐवजी बाजरीच्या सुपरफूडचा एक उत्तम पर्याय” !! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पालकांना सल्ला !!
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२३ मे २४ गुरुवार
लहान मुलांमधील वाढत्या लठ्ठपणाला फास्टफूड कारणीभूत ठरत आहे त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलांसाठी तृणधान्यापासून सुपरफूड बनविण्याचा निर्धार केला आहे परिणामी सुपरफूडच्या माध्यमातून मुलांना एक उत्तम पर्याय उपलब्ध होईल असा आशावाद उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.जागतिक बाल लठ्ठपणा दिनानिमित्त जनरेशन एक्सएल ओबेसिटी फाउंडेशनचे संस्थापक डॉ.संजय बोरुडे यांनी विशेष चर्चासत्राचे आयोजन केले होते याप्रसंगी देवेंद्र फडणवीस,मनसे प्रमुख राज ठाकरे उपस्थित होते.यावेळी कार्यक्रमाप्रसंगी जनरेशन एक्सएल ओबेसिटी फाऊंडेशनच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले.महाराष्ट्रात कमी वजनाची,कुपोषित बालके तसेच शहरी जीवनशैलीमुळे लहान मुलांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण वाढले आहे अशा दोन टोकाच्या गोष्टी पाहायला मिळतात.नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या ‘आयुष्मान भारत योजने’अंतर्गत गर्भवती महिला आणि जन्माला येणारी बालके यांची काळजी घेण्याबरोबरच मुलाच्या पौगंडावस्थेवरही लक्ष दिले आहे.राष्ट्रीय किशोर आरोग्य कार्यक्रमांतर्गत किशोरवयीन मुलांना निरोगी राहण्यास मदत केली आहे.मुलांचा लठ्ठपणा ही एक समस्या आहे त्यामुळे प्रत्येक शाळेतील किमान दोन शिक्षकांना यादृष्टीने प्रशिक्षित करावे.मुलांचा लठ्ठपणा,पोषण आणि इतर योजनांबाबत सखोल माहिती असलेली मंडळी अशा मुलांना ओळखण्यास सक्षम असावी आणि त्यांनी अशा मुलांच्या पालकांचे समुपदेशन करावे हा उपक्रम संपूर्ण भारतातील शाळांमध्ये राबविण्यात येणार आहे.शाळांनी मुलांसाठी पीटीचा तास सक्तीचा करावा.क्रीडांगण नसलेल्या शाळांना परवानगी देऊ नये तसेच क्रीडा उपक्रमही अभ्यासक्रमाचाच भाग बनवण्यात आले असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
जागतिक लठ्ठपणा अॅटलसच्या मते २०३५ पर्यंत ५१ टक्के नागरिक लठ्ठपणाने ग्रासलेले असतील तर ८७ टक्के डॉक्टरांना बालपणातील लठ्ठपणावर उपचारांविषयी माहिती नसल्याची गंभीर आकडेवारी समोर आली आहे.लठ्ठपणा हा प्राणघातक परंतु टाळता येण्याजोगा आजार आहे.मुलांना संतुलित आहार देणे,दररोज व्यायाम आणि औषधोपचाराकरिता प्रोत्साहन देणे गरजेचे आहे असे जनरल एक्सएल ओबेसिटी फाउंडेशनचे डॉ.संजय बोरुडे यांनी सांगितले.
गुबगुबीत असणे म्हणजे लठ्ठपणा-राज ठाकरे
पालकांना त्यांच्या मुलांना निरोगी आणि गुबगुबीत ठेवायला आवडते परंतु गुबगुबीत असणे म्हणजे लठ्ठपणा.पालकांना लठ्ठपणासारख्या आजाराबाबत शिक्षित करणे आणि जनजागृती करणे ही डॉक्टरांची जबाबदारी आहे.शाळांच्या उपाहारगृहात मुले जंकफूड खातात ही बाब लक्षात घेऊन शाळांमध्ये मुलांना पौष्टिक आहार कसा मिळेल याकडे लक्ष द्यायला हवे.नागरिक घरी बनवलेले अन्न खातात तेव्हा ते निरोगी राहतात अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी व्यक्त केली.