मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२७ मे २४ सोमवार
२०१९ मध्ये भारतीय जनता पक्ष व पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका करणाऱ्या मनसेने या निवडणुकीत मोदींच्या पंतप्रधानपदासाठी बिनशर्त पाठिंबा जाहीर केला.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या या भूमिकेची महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात बरीच चर्चा रंगली होती.राज ठाकरेंनी भूमिका बदलल्याची टीकाही झाली मात्र आता महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान पार पडल्यानंतर विधानपरिषदेसाठी पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली असून त्यात भाजपा विरुद्ध मनसे असा सामना रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे.अभिजीत पानसे यांना महाराष्ट्र विधानपरिषदेसाठीच्या कोकण पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशांनुसार ही उमेदवारी निश्चित झाल्याचे समोर आलेल्या पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे.या मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे निरंजन डावखरे यांची दावेदारी आत्तापर्यंत निश्चित मानली जात होती तसेच भाजपाकडून लवकरच त्यांच्या नावाची घोषणा केली जाईल असेही बोलले जात होते मात्र त्याआधीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून अभिजित पानसे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे त्यामुळे आता भारतीय जनता पक्षाची नेमकी भूमिका काय असेल ? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
दरम्यान आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा निवडून देण्यासाठी बिनशर्त पाठिंबा देत असल्याचे राज ठाकरेंनी जाहीर केले होते मात्र हा पाठिंबा फक्त लोकसभेसाठी होता की आगामी काळात येणाऱ्या निवडणुकांमध्येही राज ठाकरे महायुतीसोबत दिसतील यावर चर्चा सुरू झाली आहे.कोकण पदवीधर मतदारसंघात पानसेंच्या उमेदवारीनंतर दुसरीकडे भाजपाकडूनही या मतदारसंघाचा आग्रह धरून डावखरेंच्या उमेदवारीसाठी आग्रह धरला जाण्याची शक्यता आहे.या पार्श्वभूमीवर जर दोन्ही पक्षांमध्ये एकमत न झाल्यास कोकण पदवीधर मतदार संघासाठी लोकसभेच्या मित्रपक्षांमध्ये उभा सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे.कोकण पदवीधर मतदारसंघातून भाजपाचे निरंजन डावखरे हे दोन वेळा निवडून आले आहेत त्यामुळे याहीवेळी त्यांचा या मतदारसंघावर दावा निश्चित मानला जात होता पण मनसेने जाहीर केलेली पानसेंची उमेदवारी आणि लोकसभा निवडणुकीत मनसेचा महायुतीमध्ये झालेला समावेश यामुळे या मतदारसंघातली समीकरण नव्याने जुळवली जाऊ शकतात अशी चर्चा आता सुरू झाली आहे त्यामुळे निरंजन डावखरेंना इथून उमेदवारी नाही तर मग काय मिळणार ? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.त्यांना ऑक्टोबरमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये उमेदवारी मिळू शकते असेही बोलले जात आहे.येत्या २६ जून रोजी कोकण पदवीधर मतदारसंघासाठी मतदान पार पडणार आहे.या निवडणुकीसाठी मतदारनोंदणी झाली असून आता अभिजीत पानसेंच्या उमेदवारीमुळे मनसेकडून जोर लावला जाण्याची शक्यता आहे.गेल्या काही काळात मनसेकडून लढवण्यात येणारी ही पहिलीच निवडणूक आहे त्यामुळे या उमेदवारीच्या घोषणेमुळे मनसेचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे.