शिवसेनेचे माजी नगरसेवक एम.के मढवी ठाणे व मुंबई उपनगरे या जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी हद्दपार
परिमंडळ-१ चे पोलिस उपआयुक्त विवेक पानसरे यांची माहिती
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- शिवसेनेचे ऐरोलीतील माजी नगरसेवक मनोहर कृष्णा मढवी उर्फ एम. के मढवी यांना अखेर नवी मुंबई पोलिसांनी ठाणे व मुंबई उपनगरे या जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी हद्दपार केले आहे.शुक्रवारी या हद्दपारीची अंमलबजावणी करण्यात आली आहे अशी माहिती परिमंडळ-१ चे पोलिस उपआयुक्त विवेक पानसरे यांनी दिली आहे.पानसरे यांनी शिंदे गटात सामील होण्यासाठी दबाव आणला व तसे न केल्यास नवी मुंबईतून तडीपार करू किंवा एन्काऊंटर करू अशा धमक्या दिल्या त्याचबरोबर माझ्याकडे १० लाखांची मागणीही केली असे आरोप मढवी यांनी गेल्या आठवड्यात पत्रकार परिषदेत केले होते. तर निव्वळ तडीपारीची कारवाई होऊ नये म्हणून मढवी यांनी खोटे आरोप केल्याचे पानसरे यांनी सांगितले आहे.
गोठीवली गावात राहणारे मढवी यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेऊन त्यांना हद्दपार करण्याचा प्रस्ताव रबाळे पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक दुलवा ढाकणे यांनी ७ जुलै रोजी परिमंडळ-१च्या पोलिस उपायुक्तांकडे पाठविला होता.या प्रस्तावाची वाशी विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त डी.टी.देवे यांनी प्राथमिक चौकशी करून मढ़वी यांना दोन वर्षांसाठी मुंबई उपनगरे ठाणे व रायगड या तीन जिल्ह्यांतून हद्दपार करण्याची शिफारस परिमंडळ या पोलिस उपायुक्तांकडे केली होती.मढवी यांच्याविरोधात रबाळे पोलिस ठाण्यात ५०६ नुसार अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली.गणेशोत्सवात विसर्जनाच्या दिवशी मढवी यांच्यावर दंगलीसह मारामारीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यावर शिंदे गटात समील करून घेण्यासाठी मला जाणूनबुजून पोलिस खोट्या गुन्ह्यात अडकवत आहे असा आरोप मढवी यांनी केला.१५ सप्टेंबर रोजी त्यांचा जबाब नोंदवून घेण्यात आला.त्यानंतर वाशी विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त टेळे यांनी केलेल्या प्राथमिक चौकशीतील मुद्दे व त्यांची गंभीर गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेऊन ३० सप्टेंबर रोजीच्या हद्दपार आदेशान्वये त्यांना महाराष्ट्र पोलिस अधिनियम सन १९५१ कलम ५६ हेव (१) (अ) (ब) प्रमाणे ठाणे व मुंबई उपनगरे या दोन जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे अशी माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त पानसरे यांनी दिली आहे.