“मी दैवी अंश” आता किमान मोदींनी या मुंगेरीलालच्या गोष्टी सांगणे बंद करावे !! सलमान खुर्शीद यांची बोचरी टीका
नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२८ मे २४ मंगळवार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीत मी दैवी अंश असल्याचे वक्तव्य केले होते.एका महिला पत्रकाराने मोदींना मुलाखती दरम्यान प्रश्न विचारला होता तेव्हा त्यांचे उत्तर मोदींनी दिले होते यावर आता काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी एका मुलाखतीत मी ईश्वराचे कार्य पूर्ण करण्यासाठी आलो असल्याचे म्हटले होते.पंतप्रधान नरेंद्र मोदींना या मुलाखतीमध्ये महिला पत्रकाराने “तुम्ही एवढे काम करता तर थकत का नाहीत ?” असा प्रश्न केला त्यावर उत्तर देतांना मोदींनी आपला जन्म जैविक प्रक्रियेतून झाला नसल्याचे विधान केले असून “मी आता या निष्कर्षापर्यंत पोहोचलो आहे की,माझा जन्म जैविकदृष्ट्या झालेला नाही.मला ईश्वराने त्याचे कार्य पूर्ण करण्यासाठी पाठविले आहे” असे मोदी यांनी म्हटले होते.
माझी आई जिवंत होती तोपर्यंत मला वाटायचे की माझा जन्म झाला असावा पण आईच्या निधनानंतर मी सर्व अनुभवांना एकत्रित करून पाहतो तेव्हा मी एका निष्कर्षापर्यंत पोहोचलो आहे की परमात्म्यानेच मला पाठवले आहे.माझ्यातील ऊर्जा ही मानवी शरीरातून मिळालेली नाही ही ऊर्जा देवानेच मला दिली असून त्यामाध्यमातून त्याला काहीतरी काम करून घ्यायचे आहे व यासाठीच मला सामर्थ्यही प्रदान केले आहे तसेच मला पुरुषार्थ गाजविण्याचे सामर्थ्य आणि प्रेरणा देवाकडूनच मिळत आहे.मी काही नाही तर देवाचे साधन आहे.देवाने माझ्या रुपातून काहीतरी काम करण्याचे ठरवले आहे त्यामुळेच परिणामांची चिंता न करता मी काम करत जातो याच वक्तव्याचा समाचार सलमान खुर्शीद यांनी घेतला आहे.
पाकिस्ताबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत आहेत पण मग शाल पांघरुन नवाज शरीफ यांना भेटायला कोण गेले होते ? तेव्हा कुणाचे चांगले संबंध होते ? अशा गोष्टी तेव्हा केल्या जातात जेव्हा सांगायला काहीही नसते.या सरकारने दहा वर्षांत जर चांगली कामे केली असती जी केल्याचा दावा त्यांच्याकडून केला जातो आहे तर त्यांना हे सगळे मुद्दे काढायची आवश्यकताच भासली नसती.मोदी आमच्यावर टीका करत म्हणतात की काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिम लीगचा आहे.काँग्रेस असे का करेल ? या देशात हिंदू,मुस्लिम,शिख,ख्रिश्चन सगळ्याच धर्माचे लोक आहेत.सबका विकास आणि सबका विश्वास हे याच सरकारने म्हटले होते मग त्यात मुस्लिम समुदाय येत नाही का ? असा प्रश्न सलमान खुर्शीद यांनी विचारला आहे.आता आमच्यासमोर एक मोठी समस्या निर्माण झाली आहे कारण आत्तापर्यंत आमच्यासमोर माणसे एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते आता तसे नाहीये एक माणूस स्वतःला म्हणतोय मी माणूस नाहीच.जैविकदृष्ट्या माझा जन्मच झालेला नाही असे कुणी म्हणत असेल तर यावर काय उत्तर द्यायचे ? आम्ही डीएनए टेस्ट करा म्हणू शकतो कारण अशा गोष्टी नाटकांमध्ये,चित्रपटांमध्ये केल्या जातात.कल्पनाविश्वात अशा गोष्टी बोलल्या जातात.आम्ही याबाबत काय उत्तर देणार ? चीनने इतकी जमिनीवर कब्जा केला आहे त्याबद्दल मोदी काहीच बोलत नाहीत.मुंगेरीलालच्या किती गोष्टी निवडणूक प्रचारात आम्ही किती ऐकायच्या आहेत ? आता किमान मोदींनी या मुंगेरीलालच्या गोष्टी सांगणं बंद करावे अशी बोचरी टीका सलमान खुर्शीद यांनी केली आहे.