राजकोट-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२९ मे २४ बुधवार
गुजरातमधील राजकोट शहरात एका गेमिंग झोनमध्ये २५ मे शनिवार रोजी भीषण आग लागल्याची घटना घडली होती व या घटनेत तब्बल २८ लोकांचा मृत्यू झाला असून या आगीत अनेक लहान मुलांचाही समावेश होता.या घटनेमुळे राजकोटमध्ये आगेचा मोठा आगडोंब उसळला होता त्यानंतर या घटनेच्या चौकशीचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आले होते.ही आगीची घटना घडल्यानंतर या राजकोट गेम झोनच्या भागधारकांपैकी एक असलेले प्रकाश हिरण हे बेपत्ता होते.गेमिंग झोनला लागलेल्या आगीची घटना घडल्यानंतर प्रकाश हिरण यांच्याशी संपर्क झाला नव्हता व आता त्यांच्याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.गेमिंग झोनला भीषण आग लागली त्यावेळी प्रकाश हिरण हे घटनास्थळी उपस्थित होते.आगीची घटना घडली तेव्हा ते आग विझवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसून आले होते मात्र ही घटना घडल्यानंतर त्यांच्याशी संपर्क होत नसल्यामुळे कदाचित ते पळून गेल्याचा संशय पोलिसांना होता.आता त्यांच्याविषयी धक्कादायक माहिती समोर आली आहे.गेमिंग झोनमध्ये मृत्यू झालेल्या एका मृतदेहांची ओळख पटत नव्हती त्यानंतर त्या मृतदेहांचे डीएनए चाचणीसाठी सँपल पाठवण्यात आले होते यानंतर हा डीएनए प्रकाश हिरण यांच्या आईशी मॅच झाला.डीएनए चाचणीद्वारे प्रकाश हिरणच्या ओळखीची पुष्टी करत या घटनेत त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे यासंदर्भातील वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.दरम्यान प्रकाश हिरण यांच्याकडे या गेमिंग झोनची जवळपास ६० टक्के भागीदारी होती अशी माहिती सांगितली जात आहे.
राजकोटमध्ये टीआरपी गेमिंग झोनमध्ये झालेल्या दुर्घटनेत २८ लोकांचा मृत्यू झाला होता.या प्रकरणी युवराज हरी सिंह सोलंकी आणि राहुल राठोड या दोन भागीदारांना पोलिसांनी अटक केली होती तसेच नुकतेच हा गेमिंग झोन चालविणारा कर्मचारी नितीन जैनलाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते.या तिघांनाही सोमवारी दि.२७ मे रोजी १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.आता या प्रकरणाचा मुख्य आरोपी धवल ठक्करला राजस्थानमधून ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती सांगण्यात येत आहे.या प्रकरणात न्यायालयात आरोपींच्या विरोधात युक्तीवाद करणारे सरकारी वकील तुषार गोकानी यांनी धक्कादायक माहिती दिली आहे.युवराज सोलंकी या आरोपीने न्यायालयात जात असतांना घडलेल्या प्रसंगाचा पश्चाताप असल्याचे नाटक केले व तो रडवेला चेहरा करून न्यायालयात आला मात्र न्यायालयात आल्यानंतर काही मिनिटांतच निर्लज्जपणे हसून उत्तरे देत होता असे गोकानी यांनी सांगितले आहे.