टीम इंडियाची आतापर्यंत टी-२० विश्वचषकाच्या इतिहासातील कामगिरी !! टीम इंडिया ९ जून रोजी पाकिस्तानशी भिडणार !!
नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.३१ मे २४ शुक्रवार
आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ या स्पर्धेला २ जून पासून सुरुवात होणार असून या स्पर्धेसाठी भारतीय संघ आधीच अमेरिकेत पोहोचला असून संघाने सरावही सुरू केला आहे.भारत आणि बांगलादेश यांच्यात १ जून रोजी सराव सामना खेळवला जाणार आहे यानंतर टीम इंडियाचा विश्वचषकातील सामना ५ जूनला आयर्लंडशी होणार आहे त्यानंतर टीम इंडिया ९ जून रोजी पाकिस्तानशी भिडणार आहे.टी-२० विश्वचषकाचे आतापर्यंत ८ हंगाम खेळले गेले आहेत.टीम इंडियाने २००७ मध्ये पहिल्यांदा आणि शेवटचा टी-२० वर्ल्ड कप जिंकला होता.या स्पर्धेत भारतीय संघाचा प्रवास कसा राहिला ते जाणून घेऊया.
भारताने पदार्पणाच्या हंगामात जिंकला होता विश्वचषक
टी-२० विश्वचषक स्पर्धेला २००७ साली सुरूवात झाली.एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील युवा भारतीय संघाने पदार्पणाच्या हंगामातच ट्रॉफीवर नाव कोरले होते.भारतीय संघाने अंतिम फेरीत पाकिस्तानचा पराभव केला होता.पुढच्याच हंगामात २००९ मध्ये भारतीय संघ सुपर-८ मध्ये पोहोचला.या हंगामात पाकिस्तानने विजेतेपद पटकावले होते.२०१० च्या टी-२० विश्वचषकातही टीम इंडियाने सुपर-८ पर्यंतचा प्रवास केला होता.
वेस्ट इंडिजकडून पत्करावा लागला होता पराभव
२०१२ च्या टी-२० विश्वचषकात टीम इंडिया फक्त सुपर-८ पर्यंत पोहोचू शकली होती यानंतर २०१४ मध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.मेन इन ब्लूचा ५व्या हंगामात चांगला प्रवास होता आणि संघाने अंतिम फेरी गाठली मात्र निर्णायक सामन्यात श्रीलंकेने भारताचा ६ गडी राखून पराभव केला.टी-२० वर्ल्ड कपच्या सहाव्या मोसमात टीम इंडियाला सेमीफायनलमध्ये धडक मारण्यात यश आले.दुसऱ्या उपांत्य सामन्यात वेस्ट इंडिजने भारताचा ७ विकेट्सने पराभव करत विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न संपुष्टात आणले.
टी-२० विश्वचषक २०२१ मधील कामगिरी लाजिरवाणी राहिली
टी-२० विश्वचषक २०२१ मध्ये भारतीय संघाची कामगिरी अत्यंत लाजिरवाणी होती कारण संघ उपांत्य फेरीतही पोहोचू शकला नाही.या हंगामात पाकिस्तानने भारताचा १० गडी राखून पराभव केला होता.टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात पाकिस्तानने भारताला हरवण्याची ही पहिलीच वेळ होती यानंतर २०२२ च्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघ सेमीफायनलमध्ये पोहोचला.दुसऱ्या उपांत्य फेरीत इंग्लंडने भारताचा पराभव करून ट्रॉफीच्या शर्यतीतून बाहेर फेकले.
टी-२० विश्वचषकात भारतीय संघाची कामगिरी पुढीलप्रमाणे आहे.
टी-२० विश्वचषक २००७: भारताने अंतिम फेरीत पाकिस्तानचा पराभव करून विजेतेपद पटकावले
टी-२० विश्वचषक २००९: टीम इंडिया सुपर ८ मधून बाहेर पडली
टी-२० विश्वचषक २०१०: टीम इंडिया सुपर ८ मधून बाहेर पडली
टी-२० विश्वचषक २०१२: टीम इंडिया सुपर ८ मध्ये गेली पण उपांत्य फेरीत प्रवेश मिळाला नाही.
टी-२० विश्वचषक २०१४: टीम इंडिया अंतिम फेरीत श्रीलंकेकडून पराभूत झाली.
टी-२० विश्वचषक २०१६: टीम इंडियाने उपांत्य फेरीत प्रवेश केला पण वेस्ट इंडिजकडून पराभव झाला
टी-२० विश्वचषक २०२० (२१): टीम इंडिया सुपर १२ मधून बाहेर पडली.
टी-२० विश्वचषक २०२२: टीम इंडिया उपांत्य फेरीत इंग्लंडकडून पराभूत झाल्यानंतर बाहेर पडली.
अशी टीम इंडियाची आतापर्यंत टी-२० विश्वचषकाच्या इतिहासातील कामगिरी राहिलेली आहे.