भुसावळ-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१ जून २४ शनिवार
येथील माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील राखुंडे यांच्या खुनातील अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींना काल दि.३१ मे शुक्रवार रोजी रात्री अकरा वाजता रेल्वे न्यायालयात आणण्यात आले असता त्या तिघांना सात दिवसांची अर्थात ६ जून २०२४ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
याबाबत अधिक वृत्त असे की,दि.२९ मे २०२४ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास भुसावळ येथील जुना सातारा भाग परिसरातील मरिमाता मंदिराच्या समोर माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील राखुंडे यांच्यावर टोळक्याने अंधाधुंद गोळीबार केला होता व या अंदाधुंद गोळीबारात या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसर हादरला होता.सदरहू याप्रकरणी माजी नगरसेवक राजू भागवत सुर्यवंशी,बंटी पथरोड,शिव पथरोड,विनोद चावरिया यांच्यासह ११ जणांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता.यातील विनोद चावरिया आणि राजू सुर्यवंशी यांना गुरूवार रोजी पोलिसांनी गजाआड करण्यात यश मिळविले होते.तर या गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी करण पथरोड याने घटना घडल्यानंतर नाशिक येथे पलायन केले होते परंतु त्यालाही नाशिकमधील द्वारका परिसरातून नाशिक पोलिसांच्या पथकाने शिताफीने पकडून भुसावळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते.त्यानुसार करण पथरोड याच्यासह प्रकरणातील अन्य आरोपी राजू सुर्यवंशी व विनोद चावरिया यांना काल दि.३१ मे शुक्रवार रोजी दुपारी न्यायालयात हजर करण्यात येईल असे मानले जात होते परंतु सुरक्षेच्या कारणावरून त्यांना हजर करण्यात आले नाही तर पोलिसांनी अतिशय कडेकोट बंदोबस्तात राजू सुर्यवंशी,करण पथरोड आणि विनोद चावरिया या तिघांना रात्री अकरा वाजेच्या सुमारास तीन स्वतंत्र वाहनांमधून भुसावळ रेल्वे न्यायालयात आणण्यात आले.तेथे दोन्ही बाजूंच्या वकिलांच्या युक्तीवादानंतर न्यायाधिशांनी या तिघांना सात दिवसांची अर्थात ६ जून २०२४ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान न्यायालयीन कामकाजात या दुहेरी हत्याकांडातील काही बाबी देखील समोर आले असून यात प्रामुख्याने संतोष बारसे यांच्या बंधूंनी फिर्याद देतांना पाण्याच्या टँकरमुळे झालेल्या वादाचा उल्लेख केला आहे तसेच न्यायालयीन युक्तीवादात एका हॉस्पीटलमधील सफाईच्या
ठेक्याचा देखील संदर्भ देण्यात आला आहे.परिणामी या कारणांतून माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील राखुंडे यांचा खून करण्यात आला असावा अशी चर्चा शहरवासीयांमध्ये चर्चिली जात आहे.दरम्यान या दुहेरी खुनात अजून काही बाबींची पडताळणी तसेच इतर आरोपींचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.