लोकसभा निवडणूक होताच महायुतीत फूट? !! भाजपा-राष्ट्रवादी-मनसे-शिवसेना विधानपरिषदेसाठी आमनेसामने येण्याची शक्यता ? !!
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.३ जून २४ सोमवार
महाविकास आघाडीच्या विरोधात लोकसभा निवडणुकीत भाजपाने शिवसेना शिंदे गट,राष्ट्रवादी अजित पवार गट,मनसे आणि इतर छोट्या छोट्या पक्षांना बरोबर घेऊन महायुतीच्या वज्रमुठीची ताकद दाखविली मात्र निवडणूक पूर्ण होताच ही महायुतीची मूठ सैल झाल्याचे दिसत आहे.आगामी काळात होणाऱ्या विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत महायुतीने एकमेकांच्या विरोधात उमेदवार उभे केले आहेत.मनसेने याची सुरुवात करत कोकण पदवीधर मतदारसंघात महायुतीशी चर्चा न करता अभिनेते अभिजीत पानसे यांची उमेदवारी जाहीर केली तर राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबई शिक्षक पदवीधर मतदारसंघासाठी शिवाजीराव नलावडे यांना उमेदवारी जाहीर केली आता भाजपानेही आपले अधिकृत उमेदवार जाहीर केले आहेत.
विधानपरिषदेच्या निवडणुकांसाठी भाजपाने त्यांचे उमेदवार जाहीर केले आहेत त्यानुसार मुंबई पदवीधर मतदासंघासाठी भाजपाकडून किरण शेलार यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर कोकण पदवीधर मतदारसंघासाठी विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांना उमेदवारी दिली आहे.याशिवाय मुंबई शिक्षक मतदारसंघातून शिवनाथ दराडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.भाजपाने तीनही उमेदवार जाहीर केल्यानंतर महायुतीमध्येच आता चुरस वाढल्याचे दिसत आहे व ही आगामी विधानसभा निवणुकीची नांदी आहे का ? अशीही चर्चा होत आहे.दरम्यान कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपा विरुद्ध मनसे असे चित्र दिसत असतांनाच शिवसेना शिंदे गटानेही या निवडणुकीत उडी घेतली आहे. शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांनी कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणूकीकरिता कोकण भवन येथून उमेदवारी अर्ज घेतला आहे यामुळे शिवसेनेकडूनही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असेल असे चित्र सध्या तरी दिसत आहे परिणामी लोकसभा निवडणूक होताच महायुतीत फूट पडून भाजपा-राष्ट्रवादी-मनसे-शिवसेना विधानपरिषदेसाठी आमनेसामने येण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचे चित्र आहे.