तीन अपघातांत नऊ ठार !! कोल्हापुरात मोटारची वाहनांना धडक !! सोलापुरात मोटार धडकल्याने दुचाकीवरील तिघांचा मृत्यू !!
कोल्हापूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.४ जून २४ मंगळवार
राज्यात एकाच दिवशी झालेल्या तीन अपघातांत नऊ जणांचा मृत्यू झाला असून कोल्हापुरात मोटारीने अनेक वाहनांना धडक दिली यात मोटारचालक व शिवाजी विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू डॉ.व्ही.एम.चव्हाण यांच्यासह तिघांचा मृत्यू झाला आहे.तर वाशीम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर मोटारीने ट्रकला टक्कर दिल्यामुळे तिघे दगावले तर सोलापुरात रविवारी रात्री उशीरा मोटारीने धडक दिल्यामुळे दुचाकीवरील तिघे मृत्युमुखी पडले.कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठाजवळील अत्यंत वर्दळीच्या सायबर चौकात चव्हाण यांचे मोटारीवरील नियंत्रण सुटले व त्यांच्या मोटारीने आठ प्रवासी असलेल्या चार दुचाकींना उडवले.प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार धडक एवढी भीषण होती की दुचाकीवरील चौघे दूरवर उडाले व इतर चौघे मोटारीसह फरफटत गेले.अपघातात हर्षद पाटील वय १६,रा.दौलतनगर व अनिकेत चौगुले वय २४,रा.आसुर्ले पोर्ले यांचा मृत्यू झाला आहे तर जखमींवर सिटी रुग्णालयात व सीपीआर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.चव्हाण यांचाही अपघातावेळी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती आहे.
समृद्धी महामार्गावरून संभाजीनगरकडून अमरावतीकडे जाणाऱ्या मोटारीने ट्रकला जोरदार धडक दिली.रिधोरा इंटरचेंजजवळ सोमवारी सकाळी ही दुर्घटना घडली यात कारमधील सादल काजी,आलम हुसेन (कर अधिकारी) हे जागीच दगावले तर आरिफ खान यांचा मालेगाव ग्रामीण रुग्णालय उपचारादरम्यान मृत्यू झाला.चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर-सांगोला रस्त्यावर रविवारी रात्री मोटारीने कवठेमहांकाळ येथे बीरूदेवाच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या दुचाकीला धडक दिली यात बीरू नवलाप्पा कोळेकर (२२),विठ्ठल बीरू दिवटे (१७) आणि म्हाळप्पा महादेव धनगर (१७) यांचा मृत्यू झाला असून तिघेही बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यातील रहिवासी आहेत.सांगोला पोलिसांनी मोटारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
कोल्हापूरच्या अपघातात शिवाजी विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू डॉ.व्ही.एम.चव्हाण यांचा अपघाती मृत्यू झाल्याने शैक्षणिक क्षेत्राला धक्का बसला.प्रभारी कुलगुरू व प्र.कुलगुरू पदावर त्यांनी काम केले होते ते दीड वर्ष प्राचार्य होते.भारती विद्यापीठामध्ये संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते.शैक्षणिक,सामाजिक,सांस्कृतिक क्षेत्रामध्ये त्यांनी विविध पदे भूषविली आहेत.