मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.६ जून २४ गुरुवार
उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधून मोकळे करून पक्षात जबाबदारी देण्याची विनंती पक्षश्रेष्ठींना करण्याचे जाहीर केल्यावर त्यांना वरिष्ठ नेत्यांनी तातडीने नवी दिल्लीत पाचारण केले.फडणवीस बुधवारी रात्रीच दिल्लीत दाखल झाले असून त्यांनी रात्री व गुरूवारी सकाळी ज्येष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेवून चर्चा केली.तीन पायांच्या सरकारमधून बाहेर पडण्याच्या निर्णयावर फडणवीस ठाम असल्याचे सूत्रांनी सांगितले.लोकसभा निवडणुकीतील मुद्दे केंद्रीय पातळीवरील असतांना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व व सरकारची कामगिरी यावरून झालेल्या निवडणुकीत महाराष्ट्रात आलेल्या अपयशाचे खापर फडणवीस यांच्यावर फोडल्यास पक्षश्रेष्ठींची अडचण होणार आहे.त्यांना तोच न्याय उत्तरप्रदेशातील अपयशाबाबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लावावा लागेल व मुख्यमंत्री पदाचा राजीनामा घ्यावा लागेल.महाराष्ट्रात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस फोडल्याचा मोठा फटका भाजपला बसला.उद्धव ठाकरे व शरद पवार यांनी विश्वासघात केल्याने व शब्द न पाळल्याने त्यांना दंड देण्याची सूचना केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी केली होती.
सरकार चालवितांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर अनेक निर्णय व मुद्द्यांवर फडणवीस यांचे वाद झाले आहेत.त्यावेळी आणि निवडणूक जागावाटपात पक्षश्रेष्ठींनी शिंदे-पवार यांना झुकते माप दिले त्यामुळे तीन पायांचे सरकार चालवितांना कंटाळलेल्या फडणवीस यांनी आता त्यातून बाहेर पडून पक्षाची जबाबदारी सांभाळण्याचा मनोदय जाहीर केला आहे.मात्र फडणवीस यांना सरकार चालविताना पर्याय कोण आणि विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी गतिमानतेने निर्णय घेण्याची क्षमता असलेला दुसरा नेता कोण आहे ? हा प्रश्न पक्षश्रेष्ठींना पडला आहे त्यामुळे आता फडणवीस यांच्याबरोबरच भाजप पक्षश्रेष्ठी शिंदे-पवार यांच्याशीही चर्चा करून निर्णय घेण्याची शक्यता आहे.