“एका वर्षाच्या आत मध्यावधी निवडणुका लागणार”!! छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे मोठे विधान
छत्तीसगड-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.८ जून २४ शनिवार
लोकसभा निवडणुकीत भाजपाला पूर्ण बहुमत मिळालेले नसल्यामुळे सरकार स्थापन करण्यासाठी भाजपाला मित्रपक्षांचा टेकू घ्यावा लागणार आहे.काल शुक्रवारी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये झालेल्या बैठकीत एनडीएच्या घटक पक्षांनी नरेंद्र मोदींना आपला पाठिंबा असून एनडीएचे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल असे विधान केले.काँग्रेसच्या वरिष्ठांकडून सरकार स्थापनेसाठी कोणतेही प्रयत्न होतांना दिसले नाहीत.त्यातच आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी महत्त्वाचे विधान केले असून सहा महिने ते एक वर्षाच्या काळात मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्यता आहे असे भूपेश बघेल यांनी म्हटले आहे.भूपेश बघेल यांनी एक्सवर भूमिका मांडताना म्हटले,काँग्रेस कार्यकर्त्यांनी तयार राहावे.सहा महिने किंवा वर्षभरात मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्यता आहे.फडणवीस राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत.योगींची खुर्ची हलू लागली आहे.भजनलाल शर्माही डगमगायला लागले आहे असे भूपेश बघेल यांनी नमूद केले आहे.
एनडीएमधील महत्त्वाचा घटक पक्ष जेडीयूबद्दल बोलतांना भूपेश बघेल म्हणाले की,एनडीएचे सरकार अजून स्थापन झाले नाही तेवढ्यात जनता दल (यू)चे प्रवक्ते अग्निवीर योजना रद्द करण्याची मागणी करत आहेत तसेच जातीनिहाय जनगणना करण्यासाठी दबाव टाकत आहेत.समान नागरी संहितेची (UCC) गरज नाही असेही त्यांच्याकडून सांगितले जात आहे हे सर्व मुद्दे राहुल गांधी यांनीही उपस्थित केले होते.लवकरच एनडीएचे सरकार स्थापन होईल आणि नंतर त्यांच्यात खटके उडण्यास सुरुवात होईल.जेव्हा खटके उडायला लागतील तेव्हा सरकारचा पाया ठिसूळ व्हायला जास्त वेळ लागणार नाही.सरकार तर बनेल पण त्यात नेहमी भांडण होत राहतील असेही भूपेश बघेल म्हणाले.छत्तीसगडमध्ये भाजपाने ११ पैकी १० जागा जिंकून काँग्रेसला पिछाडीवर टाकले.काँग्रेसला कोरबा या एकमेव लोकसभा मतदारसंघात विजय मिळविता आला. याठिकाणी काँग्रेसच्या ज्योत्सना चरणदास महंत जिंकल्या आहेत.