सदरील स्फोटाची माहिती मिळताच पोलिसांनी या परिसरातील रस्ते बंद केले आहेत.ही एक केमिकल कंपनी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे तसेच अग्निशमन दलाचे पाच ते सात बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत.ही आग मोठी असून कारखान्यात सतत स्फोट होत आहेत त्यामुळे अग्निशमन दलाला आग विझवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.अमुदान कंपनीत झालेल्या स्फोटाच्या धक्क्यातून परिसरातील नागरिक अद्याप सावरलेले नाहीत अशात दोन आठवड्यांच्या अंतराने डोंबिवली एमआयडीसीत आणखी एका रासायनिक कंपनीला आग लागली आहे.राज्याच्या अनेक भागात इतक्या औद्योगिक वसाहती आहेत परंतु डोंबिवली एमआयडीसीतच अशा दुर्घटना का घडतात ? असे प्रश्न आता नागरिक उपस्थित करू लागले आहेत.

या कंपन्यांचे नियंत्रक अधिकारी या कंपन्यांची नियमित देखभाल या कंपन्यांमधील त्रृटी काढून त्याचे अनुपालन करण्याचे आदेश देतात की नाही असे प्रश्न आता उपस्थित झाले आहेत.प्रदूषण नियंत्रण मंडळ,औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य विभाग,कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांनी नियमित कंपन्यांची पाहणी केली तर असे प्रकार घडणार नाहीत.अधिकारी फक्त तीन ते चार महिन्यांतून एकदा फेरी मारून जातात.शासकीय अधिकारी कंपनीत वरिष्ठांच्या भेटी घेऊन समाधान झाले की प्रत्यक्ष पाहणी न करताच निघून जात असल्याच्या कंपनी मालकांच्या तक्रारी आहेत त्यामुळेच असे प्रकार वारंवार घडत असल्याचे उद्योजक सांगतात.अमुदान कंपनी स्फोटामुळे डोंबिवली एमआयडीसीतील ३० कंपन्या बंद करण्यात आल्या आहेत.या कंपन्या अन्य भागात स्थलांतरित करण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत त्यात पुन्हा एकदा एमआयडीसीतील रासायनिक कंपनीत आग लागल्याने कंपनी मालक पुन्हा नागरिक,शासन,चौकशी यंत्रणांकडून लक्ष्य होऊ लागले आहेत.एमआयडीसीतील या सततच्या आगीच्या दुर्घटनांमुळे परिसरातील रहिवासी चिंताग्रस्त आहेत तसेच प्रशासनाला जाग कधी येणार असा प्रश्नदेखील नागरिक उपस्थित करत आहेत.