उद्धव ठाकरे म्हणाले,या लोकांनी (नरेंद्र मोदी आणि एनडीए) निवडणुकीत काश्मीरबाबत प्रचार केला.कलम ३७० हटवल्याचा ढोल बडवला मात्र तिथले सत्य काय आहे ते आम्ही जनतेसमोर ठेवले आहे त्यावर हे लोक काहीच बोलणार नाहीत.काश्मीरमधील कलम ३७० काढल्यानंतर तिथे काही फरक पडला का ? तिकडे लोकांचे जीव जात आहेत मात्र सत्ताधारी स्वतःचा ढोल वाजवण्यात व्यस्त आहेत.तिसऱ्यांदा सरकार बनवल्याची जाहिरात करण्यात व्यस्त आहेत.मात्र देशात तीन दिवसांत तीन दहशतवादी हल्ले झाले याला जबाबदार कोण ? आताही मोदी काश्मीरला जाणार नाहीत का ? खरेतर ते केवळ विरोधकांना संपवण्यात व्यस्त आहेत.तसेच मोदींना देश सांभाळता येत नसेल तर त्यांना पंतप्रधानपदावर बसण्याचा अधिकार नाही.दुसरीकडे मणिपूरबाबत वर्षभराने का होईना मोहन भागवत बोलले ते काही कमी नाही.मणिपूरच्या झळा अखेर त्यांच्या कार्यालयापर्यंत पोहोचल्या.त्यांची संदेशवाहक यंत्रणा इतकी कुचकामी असेल असे संदेश पोहोचायला एक वर्ष लागत असेल तर ती आता सुधारावी लागेल.मोहन भागवत जे काही बोलले ते पंतप्रधान मोदी गांभीर्याने घेणार का ? निवडणूक प्रचाराच्या शेवटी भाजपा अध्यक्ष जे.पी.नड्डा म्हणाले,आम्हाला आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गरज नाही.आम्ही भाजपा म्हणून समर्थ आहोत.खरेतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला भाजपाचा पाया मानले जाते मात्र आता त्यांना संघाचीही गरज वाटत नाही.मोहन भागवत यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने मणिपूरची व्यथा मांडल्यावर पंतप्रधान आणि गृहमंत्री मणिपूरला जाणार की नाही ? असा प्रश्न पडला आहे.काश्मीर पुन्हा पेटले आहे मात्र भाजपावाले प्रचाराचा ढोल वाजवत बसले आहेत.