“दुर्दैवाने माझ्याकडे मोदींप्रमाणे दैवी शक्ती नसून मी फक्त माणूस आहे पण माझे दैवत देशातील गरीब लोक आहेत” !! राहुल गांधींची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र
केरळ-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१२ जून २४ बुधवार
लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी केरळमधील वायनाड आणि उत्तर प्रदेशमधील रायबरेली या दोन्ही मतदारसंघातून विजयी झाले असून नियमाप्रमाणे त्यांना कोणत्या तरी एकाच मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करावे लागणार आहे.यासाठी त्यांना कोणत्या तरी एका मतदारसंघाचा राजीनामा द्यावा लागेल.२०१९ साली जेव्हा राहुल गांधींचा अमेठीतून पराभव झाला होता तेव्हा केरळच्या वायनाडमुळेच त्यांना लोकसभेत जाणे शक्य झाले होते.अडचणीच्या वेळेला वायनाडने राहुल गांधींची साथ दिली.आता काँग्रेसच्या परंपरागत रायबरेलीतूनही विजय झाल्यानंतर वायनाड की रायबरेली ? असा प्रश्न राहुल गांधी यांच्यासमोर उभा राहिला आहे.दोन्ही लोकसभा मतदारसंघात विजय मिळविल्यानंतर राहुल गांधींनी काल रायबरेतील मतदारांची भेट घेतली होती तर आज केरळमधील नायनाड मतदारसंघातील जनतेशी संवाध साधून त्यांचे आभार व्यक्त केले.राहुल गांधी म्हणाले,माझ्यासमोर आता धर्मसंकट उभे राहिले आहे.मी रायबरेलीचा किंवा वायनाडचा खासदार राहू शकतो पण मी कोणताही मतदारसंघ निवडला तरी दोन्हीकडील लोकांना आनंदच होणार आहे.
केरळमधील मलप्पुरम येथे बोलतांना राहुल गांधी म्हणाले,समाजात द्वेष पसरविणाऱ्यांना चपराक बसेल असा २०२४ च्या लोकसभेचा निकाल लागला आहे.माणुसकीचा अंहकारावर आणि प्रेमाचा द्वेषावर विजय झाला आहे.राहुल गांधी यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीवरही टीका केली.ते म्हणाले,अयोध्या ज्या मतदारसंघात येते त्या फैजाबादमध्ये भाजपाचा पराभव झाला.लोकांनी हिंसा आणि द्वेषाच्या विरोधात मतदान केले.खरेतर वाराणसीमध्येही पंतप्रधान मोदींचा पराभव होता होता राहिला.भाजपाचा तर अयोध्येत पराभव झालाच पण वाराणसीनेही मोदींचा मार्ग सहज मोकळा केला नाही.तसेच मी मोदींप्रमाणे देव नाही.मी साधा माणूस आहे.मोदी सांगतात त्यांच्यात परमात्मा आहे पण तो परमात्मा सर्व निर्णय अदाणी आणि अंबानी यांच्यासाठी घेतो.त्यांच्यातला परमात्मा एका सकाळी सांगतो,मुंबई विमानतळ अदाणीला देऊन टाका. मोदीजी विमानतळ देऊन टाकतात.मग परमात्मा म्हणतो,आता लखनौ विमानतळही देऊन टाका मग तेही विमानतळ दिले जाते.मग ऊर्जा प्रकल्पही देऊन टाकले जातात.अदाणींना संरक्षण क्षेत्रात मदत व्हावी म्हणून अग्नीवीर सारखी योजना आणली जाते.दुर्दैवाने माझ्याकडे अशी दैवी शक्ती नाही मी फक्त माणूस आहे पण माझे दैवत देशातील गरीब लोक आहेत म्हणून मी माझ्या देवाशी चर्चा करतो आणि ते मला काय करायचे हे सांगतात असा टोलाही राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना लगावला आहे.