प्रधानमंत्री आवास योजनेचे थकीत हप्ते न दिल्यास राष्ट्रवादी पक्ष (पवार गट) आंदोलन करणार-जिल्हा प्रवक्ते व माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांची निवेदनाद्वारे इशारा
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१३ जून २४ गुरुवार
येथील नगर परिषद अंतर्गत सुरू असलेली प्रधानमंत्री आवास योजना ही लाभार्थ्यांना वेळेवर अनुदान मिळत नसल्याने लाभार्थी मोठया आर्थिक संकटात सापडलेला आहे.दरम्यान नगर परिषद प्रशासनाने तात्काळ या विषयाची दखल न घेतल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) गटाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा ईशारा पक्षाचे जिल्हा प्रवक्ते व माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी मुख्यधिकारी यांना दिलेल्या निवेदनाव्दारे दिला आहे.
या संदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष (पवार गट) यांच्या वतीने नगर परिषद प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,नगर परिषदच्या कार्यक्षेत्रात केन्द्र शासनाची महत्वकांक्षी अशी प्रधानमंत्री आवास (घरकुल) ही योजना सन २०१९ सुरू करण्यात आली असून शहरातुन या योजनेत ३५६ लाभार्थींचे प्रस्ताव मंजुर करण्यात आली होते.दरम्यान या ३५६ घरकुलांपैकी २५२ घरकुलांची कामे सुरू असुन प्रगतीपथावर आहे तर यातील १५५ घरकुले ही पुर्ण झाली आहे तसेच उर्वरीत ९७ घरकुले हे पूर्णत्वास असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.यात ९७ लाभार्थ्यांचे हप्ते मागील मार्च २०२३ पासुन आजपावेतो मिळालेली नाही तर यातील काही लाभार्थ्यांचा दुसरा हप्ता तर काहींचा तिसरा हप्ता व काहींचा शेवटा हप्ता मिळत नसल्याने सदरचे लाभार्थी हे लाभ मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे.
दरम्यान घरकुलाचा लाभ घेणारे हे सामान्य कटूंबातील असुन त्यांनी नगर परिषद प्रशासनाकडून अनुदान मिळणार म्हणून उसनवारी करून पैशांची उचल करीत जुळवाजुळवी करून आपल्या घरकुलांची कामे पुर्ण केली आहेत.परंतु त्यांना सदरील योजनेतुन मिळणारे हप्ते मिळत नसल्याने घरकुल लाभार्थी चांगलेच अडचणीत आले आहेत.प्रधानमंत्री आवास (घरकुल ) योजनेच्या संदर्भात घरकुलांचे लाभार्थी व आपण स्वत: वेळोवेळी नगर परिषद प्रशासनाकडे विचारणा केली असता या ठीकाणी संबंधीत अधिकाऱ्यांकडून आज होईल उद्या होईल अशी उडवा उडवीची उत्तरे दिली जात असल्याचे अतुल पाटील यांनी म्हटले आहे.तरी नगर परिषद प्रशासनाने या संदर्भात त्वरित दखल घेवुन घरकुल लाभार्थ्यांना त्यांचे थकीत हप्ते वितरीत करावे व तसे न झाल्यास आपण नगर परिषद कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) गटाच्या वतीने आंदोलन करणार असल्याचा ईशारा पक्षाचे जिल्हा प्रवक्ते अतुल पाटील यांनी मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.