Just another WordPress site

उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नेत्यांना आगामी रणनीतीबाबत दिल्या महत्त्वाच्या सूचना;बैठक संम्पन्न

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या चिन्हाचा वाद निवडणूक आयोगासमोर गेला आणि आयागाने धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला.तसेच या पोटनिवडणुकीत कोणत्याही गटाने शिवसेना हे नाव न वापरण्याच्या सूचनाही निवडणूक आयोगाने दिल्या आहेत.गेल्या काही दशकांपासून जे धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेना मतदारांच्या मनात रुजले होते तेच चिन्ह गोठवण्यात आल्याने हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. या पार्श्वभूमीवर आज उद्धव यांचे खासगी निवासस्थान असलेल्या मातोश्री येथे त्यांच्या गटाच्या नेत्यांची एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत उद्धव यांनी शिवसेना नेत्यांना आगामी रणनीतीबाबत महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.शिवसेना नेत्यांच्या बैठकीत नेमके काय घडले याबाबत आमदार भास्कर जाधव यांनी माहिती दिली आहे.

आजच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांच्यात कमालीचा आत्मविश्वास दिसत होता.ते आम्हाला म्हणाले की काल झालेल्या निर्णयामुळे शिवसैनिकांसह राज्यातील जनतेच्या मनात प्रचंड असंतोष आणि संताप आहे.स्वायत्त संस्थांच्या माध्यमातून शिवसेनेला त्रास दिला जात आहे. मात्र शिवसेनेला जितका त्रास दिला जाईल तितके लोक आपल्यामागे ठामपणे उभा राहतील.त्यामुळे आपण संयम ठेवला पाहिजे अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी नेत्यांना दिल्याचे भास्कर जाधव यांनी सांगितले आहे.

‘चिन्ह आणि नावाचे पर्याय पाठवले’

शिवसेनेचे चिन्ह गोठवल्यानंतर निवडणूक आयोगाने आम्हाला चिन्हासाठी आणि पक्षाच्या नावासाठी इतर तीन पर्याय पाठवण्याची सूचना केली होती.त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आयोगाकडे तीन पर्याय पाठवले असल्याची माहितीही भास्कर जाधव यांनी दिली आहे.इंदिरा गांधींनी आणीबाणी लावली होती पण ही अघोषित आणीबाणी आहे.काही दिवस दबक्या आवाजात याबाबत चर्चा होती मात्र कालच्या निर्णयाने ते स्पष्टच झाले आहे.जेव्हा उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला तेव्हा भाजप नेते चंद्रकांत पाटील हे देवेंद्र फडणवीस यांना पेढा भरवत होते.त्यामुळे कालचा निर्णय लागल्यानंतरही भाजप अजून शांत कशी आहे याची मी अजून वाट पाहात आहे.आम्ही लढू आणि जिंकूही मात्र झुकणार नाही असे म्हणत आमदार जाधव यांनी शिंदे गटासह भाजपला आव्हान दिले आहे.दरम्यान शिंदे गट अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक लढवणार नाही.मग तरी पक्षचिन्ह गोठवण्याचे कारण काय?शिंदे गट आतापर्यंत म्हणत होता की बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे घेऊन जातोय.मग शिंदे गट आता काय पुढे घेऊन जाणार?असा खरमरीत सवालही भास्कर जाधव यांनी विचारला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.