मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१५ जून २४ शनिवार
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ सध्या विविध कारणांमुळे चर्चेत आहेत.भाजपाची ४०० पारची घोषणा,नाशिक लोकसभेची उमेदवारी आणि राष्ट्रवादीच्या कोट्यातली राज्यसभा अशा विविध मुद्द्यांवर भुजबळ यांनी महायुती आणि स्वपक्षालाच खडे बोल सुनावले आहेत तसेच टीव्ही ९ या वृत्तवाहिनीला मुलाखत देत असतांना त्यांनी राज ठाकरेंवरही भाष्य केले.राज ठाकरेंनी शिवसेना का सोडली ? त्यांचे नेमके कशावरून मतभेद झाले ? शिवसेना सोडून त्यांनी चूक केली अशी विविध विधाने भुजबळ यांनी केल्यानंतर आता मनसेकडूनही त्याला प्रत्युत्तर देण्यात आले आहे.मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधतांना भुजबळांचा समाचार घेतला असून छगन भुजबळ कोणत्या संदर्भात बोलले याचे कारण आम्हाला उमजले नाही.भुजबळांनी या विषयावर बोलण्याचे आज कारण काय होते ? भुजबळांनी नाशिकमध्ये फार मोठी नॉलेज सिटी काढली पण भुजबळांचे नॉलेज कमी आहे.१९९३ साली १७ ते १८ आमदार घेऊन भुजबळच पहिल्यांदा बाहेर पडले.बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम भुजबळांनीच पहिल्यांदा केले.बाळासाहेबांना टी.बाळू बोलण्याची सुरुवात भुजबळांनीच केली.बाळासाहेबांचे वय न पाहता त्यांना अटक करण्याचा प्रयत्न केला.आज कोणत्या तोंडाने भुजबळ राज ठाकरेंवर आरोप करत आहेत ? असा सवाल प्रकाश महाजन यांनी उपस्थित केला आहे.
राज ठाकरे यांनी कधीही पक्ष फोडायचे काम केले नाही व त्यांचे काही तात्विक आणि अंतर्गत मतभेद झाले.बाळासाहेबांना हे मतभेद सांगून त्यांचा आशीर्वाद घेऊन राज ठाकरे बाहेर पडले.कुणालाही बाहेर पडून नवा पक्ष काढण्याचे स्वातंत्र्य आहे पण भुजबळांना आज विषय काढण्याचे कारण काय होते ? भुजबळ जेव्हा राजकीय अडचणीत येतात तेव्हा ते तात्विक मुलामा देण्याचा प्रयत्न करतात पण भुजबळांनी आता तरी खरे बोलावे.दिवंगत नेते मनोहर जोशींना मुख्यंमत्री केले ही भुजबळांची खरी पोटदुखी होती असा आरोप प्रकाश महाजन यांनी केला तसेच शिवसेनेत कधीही जात पाहिली जात नव्हती.मंडल आयोगाचा विषय पुढे करण्याचे कोणतेही कारण नव्हते.भुजबळ आज वैफल्यग्रस्त झाले आहेत त्यामुळे त्यांची सद्सदविवेकबुद्धी हरवल आहे.लोकसभेला शब्द देऊनही त्यांना उमेदवारी मिळाली नाही आता राज्यसभाही गेली. प्रचंड माया जमवल्यामुळे त्याच्या केसेस सुरू आहेत अशीही टीका प्रकाश महाजन यांनी केली.