मांडलाचे पोलीस अधीक्षक रजत सकलेचा यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार,हा १५००० चौरस फुटांचा भूखंड चराई क्षेत्र म्हणून स्थानिक प्रशासनाने जाहीर केला होता व त्यावर ही घरे बांधण्यात आली होती.काही दिवसांपूर्वी स्थानिक प्रशासनाने या अतिक्रमणासंदर्भात या घरांना नोटिसाही पाठवल्या होत्या त्यामुळे आदेश मिळाल्यानंतर स्थानिक प्रशासनाने या घरांवर कारवाई केली.दरम्यान गाय तस्करीबाबतही सकलेचा यांनी माहिती दिली असून या गावात याआधीही गाय तस्करीची ५ ते ६ प्रकरणे समोर आली होती त्यामुळे पोलिसांची गस्त वाढवण्यात आली होती.यावेळी आम्हाला माहिती मिळताच तीन पथकांनिशी आम्ही कारवाई केली व त्यांनी टाकलेल्या छाप्यात या घरांमधील फ्रीजमधून बीफ ताब्यात घेण्यात आले आहे त्याशिवाय जवळपास १०० जनावरे,जनावरांची हाडे तिथे सापडली त्याशिवाय जवळपास १५० गायी देखील ताब्यात घेण्यात आल्या आहेत असे ते म्हणाले.मध्य प्रदेशातील मांडला ते जबलपूर या भागात हे गाय तस्करीचे रॅकेट असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.या प्रकरणातील मुख्य आरोपीचा एक नातेवाईक मोठा व्यावसायिक असून तो जबलपूरला राहतो.जनावरांची हाडे सप्लिमेंट तयार करण्यासाठी वापरण्यात येणार होती तर त्यातले मांस इतर उत्पादनांसाठी वापरले जाणार होते अशी माहिती एका वरीष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.