बारामती-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१९ जून २४ बुधवार
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे तीन पक्ष एका बाजूला तर देशाची सत्ता ज्यांच्या हातात आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एका बाजूला होते त्यामुळे काय टिकाव लागणार अशी अनेकांना चिंता होती मात्र तरुणांनी,वडीलधाऱ्यांनी आणि सर्व स्तरांतील घटकांनी एकदम चोख काम केले असे वक्तव्य ज्येष्ठ नेते शरद पवारांनी बारामतीतील करंजे पूल येथे झालेल्या शेतकरी संवाद मेळाव्यात केले.पवार म्हणाले की,या वेळच्या निवडणुकीला पहिल्यांदा एक प्रकारचे दहशतीचे वातावरण होते की काय माहीत नाही.१९६७ पासून सतत ५६ वर्षे निवडून येणारा देशात दुसरा प्रतिनिधी नाही ही किमया तुम्ही लोकांनी केली आणि तेच काम लोकसभेच्या निवडणुकीमध्ये केले.बारामती येथील मतदार समंजस,शहाणे आहेत हा संदेश देशभरात गेला.यापूर्वी अनेक वर्षे आपण विकासाच्या कामात लक्ष घातले. अलीकडच्या काळात मी लक्ष देत नव्हतो.दुसऱ्यांवर जबाबदारी टाकली होती पण आता लक्ष घालावे लागेल अशा शब्दांत पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र दिले असून त्यांच्या अधिकाऱ्यांच्या कानावर घातले आहे त्यांनी निर्णय घेतला तर आनंदच आहे.जर का निर्णय घेतला नाही तर लोकशाहीमध्ये जनतेच्या जोरावर योग्य पद्धतीने काय सांगायचे हा मार्ग आम्हाला माहिती आहे असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.