औरंगाबाद-पोलीस नायक(वृत्तसेवा):- शहर बसमधून शाळेतून घरी निघालेल्या नववीच्या विद्यार्थ्याने बसच्या खिडकीतून डोकावताच लोखंडी खांब धडकल्याने १४ वर्षीय शाळकरी मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी साडेबाराच्या सुमारास औरंगपुऱ्यातील जिल्हा परिषद मैदानासमोर घडली.हरीओम राधाकृष्ण पंडित वय १४ रा.बजाजनगर,वाळूज असे मृत मुलाचे नाव आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की,हरीओम हा सरस्वती भुवन शाळेत इयता नववीच्या वर्गात शिकत होता.दुपारी शाळा सुटल्यावर तो जिल्हा परिषद मैदान येथून शहर स्मार्ट सिटीबस क्र.एम एच २० ई जी ९८६२ मध्ये बजाजनगरकडे घरी जाण्यासाठी बसला होता.दरम्यान बस मध्ये बसलेल्या हरिओमने खिडकीतून डोके बाहेर काढून बघत असतानाच बाहेरील भिंत व खांबा डोक्याला लागून जबर धक्का बसला आणि हरिओम रक्तबंबाळ अवस्थेत निपचित पडला.हरिओमला तातडीने उपस्थितांनी त्याच परिस्थितीत शासकीय घाटी रुग्णालयात हलविले.मात्र तो पर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती.डॉक्टरांनी तपासून हरिओमला मृत घोषित केले.या प्रकरणी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात घटनेची नोंद घेण्यात आली आहे.पुढील कारवाई सुरु असल्याची माहिती क्रांतिचौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉ.गणपत दराडे यांनी दिली आहे.