मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२० जून २४ गुरुवार
लोकसभा निवडणूक निकालानंतर शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा मुंबईत पार पडला.शिवसेनेच्या या वर्धापन दिन सोहळ्यात उद्धव ठाकरेंनी भाजपावर टीकेची तोफ डागली.देवेंद्र फडणवीस,एकनाथ शिंदे,राज ठाकरे व नरेंद्र मोदी यांच्यावर त्यांनी चांगलीच टीका केली.एवढेच नाही तर हे सरकार कोसळले पाहिजे आणि मध्यावधी निवडणुका झाल्या पाहिजेत म्हणजे आपण जिंकून येऊ असेही उद्धव ठाकरे म्हणाले.भाजपाला या लोकसभा निवडणुकीत चांगलाच तडाखा बसला पण गोष्टी वळवायच्या कशा ? हे त्यांना बरोबर समजले आहे त्यामुळे निवडणूक झाल्यानंतर पुन्हा सुरु केले की उद्धव ठाकरे पुन्हा एनडीएबरोबर जायचे.मी तुम्हाला विचारतोय जायचे ? उद्धव ठाकरेंनी हे विचारताच नाही असे उत्तर समोरच्या गर्दीने दिले.“तुमचे तुम्ही बघा की..काय काय उघडे पडले ते बघा.” असे उद्धव ठाकरे म्हणाले.घराणेशाही म्हटल्यावर थोडी घराणेशाही माझ्या शब्दांमध्ये येतेच त्यामुळेच मी म्हटले की यांची फाटली आहे.उद्धव ठाकरे एनडीएत जाणार अशा चर्चा,मग भुजबळ शिवसेनेत जाणार.भुजबळ माझ्याशी बोलले नाहीत ते मंत्री आहेत ते बघतील काय करायचे मात्र सांगड घालण्याचा आणि अपयश झाकण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला जात आहे तसेच पुन्हा निवडणूक झाली पाहिजे कारण आज ज्यांचा सत्कार केला ते उद्या खासदार होतील.आपल्यावर आरोप केला जातोय की शिवसेनेला हिंदू मते नाहीत,मुस्लीम मते पडली आहेत.हो पडली आहेत,शिवसेनेने हिंदुत्व सोडले म्हणत आहेत.डोमकावळे आज जमले आहेत त्यांची कावकाव सुरु झाली आहे.मी हिंदुत्व वगैरे सोडलेले नाही असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावले आहे.
देशातली लोकशाही वाचवण्यासाठी हिंदुत्व सोडले आहे असे नरेंद्र मोदी म्हणत असतील तर नरेंद्र मोदींनी भाजपाने सत्तेसाठी हिंदुत्व सोडले आहे हा माझा आरोप आहे.२०१४ आणि २०१९ यावेळी जे फोटो आहेत ते बघा.आज भाजपाबरोबर कोण बसले आहे चंद्राबाबू आणि नितीश कुमार ते काय हिंदुत्ववादी आहेत ? आंध्रात चंद्राबाबूंनी मुस्लीम समाजाला वचन दिलेली नाहीत का ? नितीश कुमारांनी मुस्लीम समाजाला वचन दिलेली नाहीत का ? असा सवाल उद्धव ठाकरेंनी भाषणात केला.मुस्लीम समाज आमच्याबरोबर आहेच कारण आम्ही वार करु तर समोरुन करु,यांच्यासारखा पाठीत वार करणार नाही असे उद्धव ठाकरे म्हणाले.मिंधे यांनी शहरी नक्षलवादाचा मुद्दा काढला.हुकूमशाही मोडा हा जर तुम्हाला आतंकवाद वाटतो का ? देशाचे संविधान वाचवणे हा आतंकवाद वाटत असेल तर मी आतंकवादी आहे असेही उद्धव ठाकरे म्हणाले.तुमचे जे बापजादे दिल्लीत बसलेत ते सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करत आहेत.रवींद्र वायकरांनी सांगितले की माझ्यापुढे मार्गच नव्हता तुरुंगात जा की आमच्याकडे या.तो भ्रष्ट माणूस हे सांगतो हा तुमचा शासकीय नक्षलवाद नाही का ? पक्ष फोडायचे,सरकार पाडायचे,फोडलेल्या लोकांना मंत्रिपदे द्यायची हा लोकशाहीची हत्या करणारा नक्षलवाद आहे असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.