“महायुतीत आपण दोघे भाऊ आणि मिळून खाऊ…” !! विधानसभेच्या जागावाटपावरून रामदास कदम यांची भाजपाकडे मागणी
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२१ जून २४ शुक्रवार
शिवसेनेच्या ५८ व्या वर्धापन दिनानंतर शिवसेना शिंदे गट विरुद्ध राष्ट्रवादीचा अजित पवार गट असे वाकयुद्ध रंगलेले पाहायला मिळत असून शिवसेनेकडून रामदास कदम आणि राष्ट्रवादीकडून अमोल मिटकरी हे एकमेकांवर शेलक्या शब्दांत टीका करत आहेत.अजित पवारांना थोडे दिवस युतीत घेतले नसते तरी चालले असते असे विधान करून रामदास कदम यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे.अमोल मिटकरींनीही तात्काळ त्याला प्रत्युत्तर देत “आम्ही आलो म्हणून तुमची लंगोटी वाचली” असे म्हटले आहे.यानंतर आता रामदास कदम यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना भाजपा आणि शिवसेनेत जागावाटप करून घेऊ असे तर्कट मांडले आहे.टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलत असतांना रामदास कदम म्हणाले,आम्ही जागावाटपात विधानसभेच्या १०० जागा मागितल्या आहेत त्यातल्या आम्ही ९० जागा जिंकू ही आमची विनंतीवजा मागणी आहे.माझ्या नावात भाई असले तरी मी विनंती करत आहे.आम्ही भाऊ म्हणून तुमच्याकडे विश्वासाने आलो तर आपण दोघे (भाजपा आणि शिवसेना) भाऊ वाटून खाऊ व जेवढ्या जागा तुम्ही लढविणार तेवढ्या जागा आम्हाला द्या असे रामदास कदम यांनी म्हटले आहे.
लोकसभेत आम्हाला १५ जागा देण्यात आल्या व मागच्यावेळेस आमचे १८ खासदार होते.आम्हाला १५ जागा मिळूनही जर का उमेदवार भाजपाप्रमाणेच वेळेवर जाहीर केले असते तर आमचे १३ ते १४ खासदार निवडून आले असते पण अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आम्हाला लटकविण्यात आले.ठाणे,कल्याण,नाशिक जागेवर भाजपानेच दावा ठोकला.मुख्यमंत्र्यांचा लेक निवडून येणार नाही असे सांगितले. पाच वेळा निवडून आलेल्या भावना गवळीला तिकीट नाकारण्यास सांगितले.हिंगोलीचा जाहीर झालेला उमेदवार बदलण्यास भाग पाडले. भाजपाने आमचे आम्हाला बघू द्यायला हवे होते.भाजपाच्या काही नेत्यांमुळे भाजपाचे तर नुकसान झालेच पण एकनाथ शिंदेंचेही नुकसान झाले आणि पर्यायाने पंतप्रधान मोदींचेही नुकसान झाले असा आरोप रामदास कदम यांनी केला.लोकसभा निवडणुकीत भाजपामधील काही नेत्यांनी हट्ट केला त्यातून मुख्यमंत्री शिंदेंवर जो अन्याय झाला तो अन्याय विधानसभेत होऊ नये असा माझा प्रयत्न होता व तीच भूमिका मी काल वर्धापनदिनात मांडली असेही रामदास कदम म्हणाले.लोकसभा निवडणुकीत सर्व्हेवर अवलंबून राहिल्यामुळे काय झाले ? याचे उत्तर भाजपाला मिळाले आहे त्यामुळे विधानसभेत आम्ही कोणताही सर्व्हे माननार नाही असेही रामदास कदम म्हणाले.राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी केलेल्या टीकेलाही यावेळी कदम यांनी उत्तर दिले.आमच्यामुळे राष्ट्रवादीची एक लंगोट वाचली.सुनील तटकरे कुणामुळे निवडून आले हे विचारा.रायगडमध्ये भाजपाने धैर्यशील पाटीलची उमेदवारी अंतिम केली होती पण ही उमेदवारी सुनील तटकरेंना मिळवून देण्यात आम्ही काय प्रयत्न केले हे आम्हालाच माहीत अशी टीका रामदास कदम यांनी केली.