“माझ्या पक्षाचा नेता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावा” !! राष्ट्रवादी आमदार अमोल मिटकरी यांचे वक्तव्य
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२७ जून २४ गुरुवार
माझ्या पक्षाचा नेता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावा असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटातील विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी केले आहे.महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासाठी आमच्या पक्षाकडे अजित पवारांसारखा आश्वासक चेहरा आहे असेही मिटकरी यांनी म्हटले आहे तसेच मिटकरी यांनी महायुतीमधील त्यांच्या मित्रपक्षांना (भाजपा-शिवसेनेचा शिंदे गट) सूचक इशारा दिला आहे की आमच्या पक्षाला हलक्यात घेऊ नका.दरम्यान शिवसेनेच्या शिंदे गटाने अजित पवार गटाला प्रत्युत्तर दिले असून शिंदे गटातील बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी म्हटले आहे की राज्यातील जनतेला एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री म्हणून हवे आहेत.अमोल मिटकरी म्हणाले,मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आमदार आहे आणि मला वाटते की माझ्या पक्षाचा नेता महाराष्ट्र मुख्यमंत्री व्हावा.हीच माझी भूमिका आहे मुख्यमंत्रिपदासाठी अजित पवारांशिवाय आमच्या पक्षात दुसरे कोण आहे ? अजित पवार हेच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा आहेत.आमचा पक्ष हा एक प्रादेशिक पक्ष आहे आणि आमची मोठी प्रादेशिक ताकद आहे त्यामुळे मी आमच्या दोन्ही मित्रपक्षांना प्रसारमाध्यमांद्वारे अत्यंत नम्रपणे विनंती करतो की तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला हलक्यात घेऊ नका.
दरम्यान शिवसेनेच्या शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड म्हणाले,उद्धव ठाकरे यापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते.मुख्यमंत्री म्हणून लोकांनी त्यांचा चेहरा पाहिला परंतु तो चेहरा कधी विधानभवनात दिसला नाही ते कधी मंत्रालयात येत नव्हते त्यामुळे त्या चेहऱ्याला महाराष्ट्रातील जनतेने घरी बसवले आता जनतेत जाणारा एकच चेहरा आहे व तो चेहरा म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.ते लोकांच्या सुख दुःखात सहभागी होतात व हा चेहरा महाराष्ट्रातील जनतेला घेऊन पुढे जात आहे.संजय गायकवाड यांनी संजय राऊत (शिवसेनेच्या ठाकरे गटातील राज्यसभेचे खासदार) यांच्या मुख्यमंत्रिपदाबाबतच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली असून उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा बनू शकतात असे वक्तव्य राऊत यांनी केले होते त्यावर संजय गायकवाड म्हणाले,तुम्ही उद्धव ठाकरे यांचा चेहरा मुख्यमंत्रिपदासाठी जाहीर करत आहात परंतु काँग्रेस स्वबळाची भाषा करू लागली आहे यामुळे महाविकास आघाडीत बिघाड झाल्याशिवाय राहणार नाही.तुम्ही कोणताही चेहरा घेऊन निवडणूक लढू शकणार नाही.मुळात महाविकास आघाडीची एवढी क्षमता नाही.