“गल्लीतील कार्यकर्ते अजित पवारांवर बोलतात व आम्ही शांततेने ऐकायचे का?” !! अमोल मिटकरी यांचा महायुतीतील नेत्यांना सवाल
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२८ जून २४ शुक्रवार
राज्यात काही महिन्यामध्ये विधानसभेची निवडणूक जाहीर होणार आहे व त्या अनुषंगाने राजकीय पक्ष कामाला लागले आहेत.महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये बैठकांचा धडाका सुरु आहे तसेच महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला कसा असेल ? याबाबत नेत्यांमध्ये सध्या चर्चा सुरु आहेत असे असतांनाच महायुतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून धुसफूस सुरू असल्याची चर्चा आहे. लोकसभेच्या निवडणुकीनंतर महायुतीमध्ये आरोप-प्रत्यारोपाच राजकारण सुरु झाले असून आता विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे त्यामुळे सर्वांचे लक्ष या अधिवेशनाकडे लागलेले आहे व हे अधिवेशन येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाचे मानले जात आहे असे असतांनाच महायुतीमधील नेते एकमेकांवर आरोप करत असल्याचे चित्र आहे.पुणे जिल्ह्यातील शिरूरमध्ये एका बैठकीत भाजपाच्या एका कार्यकर्त्याने थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली तसेच त्यांना महायुतीमधून बाहेर काढण्याची मागणी केली त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले.यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते,आमदार अमोल मिटकरी यांनी थेट भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांना इशारा दिला असून ते म्हणाले,पुण्यात भाजपाचा कोणीतरी एक गल्लीतील कार्यकर्ता अजित पवारांवर बोलला मग आम्ही हे शांततेने ऐकायचे का ? महायुतीचा धर्म पाळण्याचा ठेका फक्त राष्ट्रवादीने घेतलाय का ? असे विधान अमोल मिटकरी यांनी केले असून ते टिव्ही ९ मराठीशी बोलत होते.
मी याआधी सांगितले होते की,महायुतीमधील तिन्ही पक्षांनी समन्वय साधणे महत्वाचे आहे.आम्ही ज्यावेळी टीका करतो त्यावेळी अनेकांना वाईट वाटत असेल तर त्यांनीही थोडसे आपल्या जिभेला आवर घातला पाहिजे.दुसऱ्यांची औकात काढण्यापेक्षा आपलीही औकात पाहीली पाहिजे त्यानंतर बोलले पाहिजे.आमच्या पक्षाकडून आम्हाला नोटीस प्राप्त झाली असे कळत आहे.अद्याप मला मिळाली नाही मात्र राष्ट्रवादीलाच राष्ट्रवादीने नोटीस द्यावी त्यापेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या प्रवक्त्यांना आणि भारतीय जनता पार्टीने त्यांच्या प्रवक्त्यांना नोटीस दिली पाहिजे असे अमोल मिटकरी म्हणाले.मिटकरी पुढे म्हणाले,आमच्या पक्षाला वाटते की महायुती टिकली पाहिजे.महायुतीमध्ये आम्ही तिन्ही पक्षांनी एकत्र असले पाहिजे पण त्यांच्या पक्षाला वाटत नसेल म्हणून ते आवरत नाहीत.आमच्या पक्षाला वाटते की महायुती टिकली पाहिजे. माझ्या पक्षाने माझ्यावर जबरदस्ती केधीही केली नाही.समज नक्की दिली.मी देखील सांभाळून बोलतो अन्यथा काहींनी माझी औकात काढल्यानंतर मला तोडीस तोड उत्तर देता येत होते फक्त आमच्या प्रदेशाध्यक्षांनी काही प्रोटोकॉल ठेवले त्यामुळे मी काही बोललो नाही.माझे संस्कार मी सोडले नाहीत.आता पुण्यात कोणीतरी गल्ली बोळातला कार्यकर्ता अजित पवार यांच्यावर बोलून गेला मग हे आम्ही शांततेने ऐकायचे का ? असा सवाल अमोल मिटकरी यांनी केला आहे.
कोणीतरी एक कार्यकर्ता अजित पवारांवर बोलला त्यावेळी त्या ठिकाणी आमदार राहुल कुल होते त्यांना कळले नाही का ? की महायुतीमधील एका नेत्यांवर आपल्याच पक्षामधील गल्लीतील एक कार्यकर्ता बोलतो आहे त्याचा विरोध करायला हवा होता त्यांनी का विरोध केला नाही हाच माझा प्रश्न आहे.एवढ्या मोठ्या नेत्यांवर कुणीही टीका करते आणि त्यांना कोणीही बोलत नसेल तर प्रश्न आहे.आता राहुल कुल यांच्यासमोर जे बोलले आहेत हे दरेकरांना सांगा ना ? की महायुतीचा धर्म कोणी पाळावा.महायुतीचा धर्म पाळण्याचा ठेका फक्त राष्ट्रवादीने घेतलाय का ? इतर दोन पक्षांनीही प्रोटोकॉल पाळला पाहिजे असे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.