Just another WordPress site

“तुका म्हणे बरा !! लाभ काय तो विचारा !!” निवडणुकीच्या तोंडावर शेतकरी,महिला व तरुणांसाठी आकर्षक योजनांसह घोषणांचा वर्षाव

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.२९ जून २४ शनिवार

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकरी,महिला व विद्यार्थी अशा सर्वच घटकांवर विविध सवलती आणि अनुदानांच्या योजनांचा वर्षाव करणारा अतिरिक्त अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी काल शुक्रवार रोजी सादर केला.मात्र एक लाख दहा हजार कोटींची वित्तीय तूट,२० हजार कोटींची महसुली तूट असतांना या सर्व योजनांसाठी आणखी एक लाख कोटींचा बोजा सरकारवर पडणार आहे व त्यासाठी निधी कुठून मिळणार याचे उत्तर संकल्पात नाही त्यामुळे या योजनांची अंमलबजावणी करतांना राज्य सरकारला तारेवरची कसरत करावी लागणार असून त्यामुळेच की काय विकासकामांसाठीच्या तरतुदीला अर्थसंकल्पात कात्री लावण्यात आली आहे.विधिमंडळाच्या अधिवेशनात अर्थमंत्री या नात्याने वैयक्तिक दहावा अर्थसंकल्प सादर करतांना अजित पवार यांनी भाषणाची सुरुवात आणि शेवट जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या ओळींनी केली.आषाढी वारीनिमित्त तुकाराम महाराजांची पालखी देहूतून प्रस्थान ठेवत असतानाच विधिमंडळातील भाषणात अजितदादांनी ‘तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा,तरी माझ्या दैवा,पार नाही’ असे बोलून दाखवले.मात्र सवलतींचा वर्षाव करणाऱ्या या ‘सेवे’मागचे आर्थिक गणित न उलगडल्याने ‘तुका म्हणे बरा !! लाभ काय तो विचारा !!’ असा तुकारामाचा प्रश्न या अर्थसंकल्पाबाबत उपस्थित होईल.

लोकसभा निवडणुकीतील पराभवामुळे हादरलेल्या महायुतीच्या नेत्यांनी आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून विविध समाज घटकांवर सवलतींचा वर्षाव केला आहे व यातून सत्ताधारी पक्षांबद्दलची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.शेतकऱ्यांना शेती पंपासाठी मोफत वीज,२१ ते ६० वयोगटातील पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये देणारी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’,इतर मागासवर्गीय किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थिनींना शैक्षणिक शुल्कमाफी,दारिद्र्य रेषेखालील पात्र कुटुंबाना दरवर्षी तीन सिलिंडर मोफत,विद्यार्थ्यांना १० हजार रुपये विद्यावेतन या नवीन योजना विधानसभा निवडणुकीतील प्रचारात महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. अपेक्षेप्रमाणे कोणतीही करवाढ अर्थमंत्र्यांनी केलेली नाही त्याचवेळी मुंबई,ठाणे,नवी मुंबईत पेट्रोल,डिझेलवरील करात कपात करून या शहरांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.भांडवली म्हणजेच विकास कामांवर एकूण खर्चाच्या १३ टक्के रक्कम खर्च करण्यात येणार आहे. पण २०२३-२४ या आर्थिक वर्षात सुधारित अर्थसंकल्पात विकास कामांवर ९४ हजार ८५० कोटींची तरतूद करण्यात आली होती.पुढील वर्षाच्या अतिरिक्त अर्थसंकल्पात ९२,७७९ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

शासनाच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्याकरिता दरवर्षी ५० हजार युवकांना कार्यप्रशिक्षण देण्याची तरतूद करण्यात आली आहे.या योजनेचा ऊहापोह करण्यात आलेला नसला तरी सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांची सोय लावण्याचा हा प्रकार असल्याची कुजबूज मंत्रालयात होती व या योजनेत पैसे किती देणार याचा उल्लेख नसला तरी विद्यावेतनाएवढेच १० हजार रुपये दिले जाण्याची शक्यता आहे.मुंबई, नवी मुंबई व ठाण्यातील डिझेलवरील सध्याच्या २४ टक्क्यांचा कर तीन टक्क्यांनी कमी करून २१ टक्के करण्याचा तसेच पेट्रोलवरील कर २६ टक्क्यांवरून २५ टक्के करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे यामुळे मुंबई,ठाणे आणि नवी मुंबईतील पेट्रोल प्रति लिटरला ६५ पैसे तर डिझेल दोन रुपये सात पैशांनी स्वस्त होईल असे अर्थमंत्र्यांनी जाहीर केले.मुंबई,ठाणे व नवी मुंबई ही तीन शहरे वगळता राज्यात अन्यत्र इंधनाच्या दरात फरक पडणार नाही.तर मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही जुलै महिन्यापासून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना राबवण्यात येणार असून २१ ते ६० वयोगटातील पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये भता दिला जाईल मात्र त्यामध्ये कुटुंबाच्या उत्पन्नमर्यादेची अट ठेवण्यात आली आहे.

स्वावलंबी शेतकरी,संपन्न शेतकरी हे ब्रीद जपत शेतकऱ्यांना विविध पातळीवर सहाय्य करण्यासाठी कटिबद्ध असल्याचा दावा करणाऱ्या महायुती सरकारने ४४ लाख कृषीपंप धारक शेतकऱ्यांना मोफत वीज आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना गाईच्या दूधासाठी प्रतिलिटर पाच रुपये अनुदानाचा अपवाद वगळता अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांवर जुन्याच योजनांचा शिडकाव करीत दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.महायुती सरकारने सत्तेवर येताच शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी,एक रुपयात पीक विमा,गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान अशा योजना लागू केल्या आहेत.यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना कर्जमाफी,वीज माफी मिळावी अशी मागणी केली जात होती व त्यातील वीजबील माफीची घोषणा करीत सरकारने शेतकऱ्यांना खूष केले असले तरी राज्यातील सुमारे एक कोटी ५२ लाख शेतकऱ्यांपैकी फक्त ४४ लाख ६ हजार शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे.

योजना काय ?

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेचा सहा हजार कोटींचा दुसरा टप्पा २१ जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे.कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत हेक्टरी पाच हजार रुपयांचे अर्थसाह्य देण्याची घोषणा सरकारने लोकसभा निवडणुकीपूर्वी केली होती मात्र आचारसंहितेमुळे या योजनेची अंमलबजावणी होऊ शकली नव्हती व आता पुन्हा या योजनेची घोषणा करण्यात आली आहे.कांदा आणि कापसाची हमीभावाने खरेदी करण्यासाठी प्रत्येकी २०० कोटी रुपयांचा फिरता निधी निर्माण करण्याची घोषणा अजित पवार यांनी केली. नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत आतापर्यंत ९२ लाख ४३ हजार शेतकऱ्यांना कुटुंबांना ५ हजार ३१८ कोटी ४७ लाख रुपये अनुदान देण्यात आले आहे.

निवडणुकीत फटका बसल्याने कापूस,सोयाबीन उत्पादकांना पाच हजारांचे अर्थसहाय्य

लोकसभा निवडणुकीत कांदा,सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या नाराजीचा विदर्भ आणि मराठवाड्यात फटका बसल्यावर तसेच कांदा निर्यातबंदीचा घोळ घातल्याने नाशिक जिल्ह्यात अपयश आल्यानेच महायुती सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.कापूस आणि सोयाबीनचे दर कोसळल्याने शेतकऱ्यांना फटका बसला होता व या दोन्ही उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टर्सच्या मर्यादेत पाच हजार रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात येत असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली.अर्थसहाय्याची घोषणा यापूर्वी करण्यात आली होती पण निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने मदत वाटप होऊ शकले नव्हते आता ही मदत करण्यात येईल असे पवार यांनी सांगितले.कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सरकारच्या धोरणाचा फटका बसला होता यामुळे नाशिक जिल्ह्यात महायुतीला मोठा फटका बसला.कांदा आणि कापसाची हमीभावाने खरेदी करण्याकरिता २०० कोटींचा फिरता निधी निर्माण करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

दहा लाख युवकांना दरमहा १० हजार रुपये विद्यावेतन तर डॉक्टरांची संख्या वाढविण्यावर भर

राज्यातील दहा लाख युवकांना प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन दरमहा दहा हजार रुपयांपर्यंत विद्यावेतन देणाऱ्या ‘मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजने’ची घोषणा उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी केली असून या योजनेसाठी सुमारे सहा हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. राज्यात डॉक्टरांची संख्या वाढविण्यासाठी राज्यात प्रत्येकी १०० विद्यार्थी क्षमतेची १८ नवीन शासकीय महाविद्यालये सुरू करण्याचे पवार यांनी जाहीर केले तर विद्यार्थी व तरुणांसाठी सरकारने विविध योजना जाहीर केल्या आहेत.राज्यात सध्या एक लाख लोकसंख्येमागे असलेले ८४ डॉक्टरचे प्रमाण २०३५ पर्यंत १०० हून अधिक करण्यासाठी प्रत्येकी १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेची नवीन १८ शासकीय वैद्याकीय महाविद्यालये आणि त्यांच्याशी ४३० खाटांची संलग्न रुग्णालये सुरु करण्यास सरकारने मान्यता दिली आहे.ही महाविद्यालये जालना,हिंगोली,धाराशिव,परभणी, नाशिक,जळगाव,अमरावती,बुलढाणा,वाशिम,वर्धा,भंडारा,गडचिरोली,सातारा,अलिबाग,सिंधुदुर्ग,रत्नागिरी,पालघर आणि अंबरनाथ (जि.ठाणे) येथे सुरु करण्यात येणार आहेत.रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात सावर येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय युनानी महाविद्यालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली असून बुलढाणा जिल्ह्यात नवीन शासकीय आयुर्वेद महाविद्यालय सुरु करण्यात येणार आहे.शासकीय वैद्याकीय महाविद्यालयातील कनिष्ठ व वरिष्ठ निवासी डॉक्टर यांच्या विद्यावेतनात तसेच मानसेवी अध्यापकांच्या मानधनात भरीव वाढ करण्यात आली आहे असे पवार यांनी नमूद केले.

जागतिक बॅंक साहाय्यित दोन हजार ३०७ कोटी रुपये किमतीच्या ‘मानवी विकासासाठी उपयोजित ज्ञान आणि कौशल्य विकास’ प्रकल्पाअंतर्गत ५०० औद्याोगिक प्रशिक्षण संस्थांची दर्जावाढ,मॉडेल आयटीआय,जागतिक कौशल्य केंद्र,महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ,डेटा सेंटर अशा विविध संस्थांचे बळकटीकरण करण्यात येणार असून उद्योजकता विकास कार्यक्रमही राबविण्यात येणार आहे.मुंबई,पुणे,नागपूर, अमरावती,यवतमाळ,कोल्हापूर,छत्रपती संभाजीनगर,कराड,अवसरी (जिल्हा पुणे) येथील तंत्रशिक्षण संस्थांमध्ये ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

रोजगाराभिमुख प्रशिक्षण

आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था (टीआरटीआय),डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी),छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्था (सारथी),महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती),महाराष्ट्र संशोधन व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) आदी संस्थांमार्फत एकूण दोन लाख ५१ हजार ३९३ विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्यात येत असून ५२ हजार ४०५ विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.संशोधन व नवउपक्रम केंद्रांसाठी विद्यापीठ व शासनाकडून प्रत्येकी ५० कोटी असा एकूण १०० कोटी रुपयांचा निधी,शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत स्वयंरोजगार अर्थसहाय्याच्या योजनांसाठी १०० कोटी रुपये,अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी २०२४-२५ पासून विदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना,इतर मागास वर्ग,विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेअंतर्गत दरवर्षी ३८ ते ६० हजार रुपये निवासभत्ता याचा लाभ देण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.