यावल येथे उद्या गुरूपौर्णिमा निमित्ताने महर्षी व्यास मंदीरात महापुजा व दुग्धाभिषेक कार्यक्रमाचे आयोजन
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२० जुलै २४ शनिवार
येथे गुरु पौर्णिमा निमित्ताने उद्या दि.२१ जुलै रविवार रोजी येथील प्रसिद्ध महर्षी व्यास मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी विश्वस्तांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने सकाळी ८ वाजता महर्षी व्यासांची महापुजा व दुग्धाभिषेक आयोजीत करण्यात आला आहे.
गुरूपोर्णिमा निमित्ताने जिल्ह्यातील हजारो भाविक महर्षींच्या चरणी लिन होण्यासाठी यावल येथील महर्षींच्या मंदिरात हजेरी लावतात. अध्यात्मिक क्षेत्रात गुरु-शिष्य परंपरेस अनन्य साधारण महत्त्व आहे . या परंपरेत ‘ महर्षी व्यास ‘गुरू’ अग्रस्थानी आहेत.महर्षी व्यासांना भारतीय संस्कृतीतील अद्भुत रहस्य मानले जाते.असे म्हणतात क, ”व्यासोच्छीट जगत सर्व ” ! अर्थात या पृथ्वीतलावरील कोणत्याही ज्ञानाची जाणीव सर्वप्रथम महर्षी व्यासांना होते.महर्षी व्यास हे गुरूंचे प्रतिनिधी आहेत त्यामुळे महर्षी व्यासांना गुरु परंपरेत श्रेष्ठ स्थान आहे.चार वेद,अठरा पुराण व महाभारत रचयीते.महर्षी व्यासांचे येथे भव्य मंदिर आहे.दरवर्षी गुरु पौर्णिमेस मोठा उत्सव साजरा करण्यात येतो तसेच परीसरात यात्रेचे आयोजन केले जाते.या निमित्ताने मंदिर व परीसरात रोषणाई करण्यात आली आहे.
आख्यायिका
महर्षी व्यासांनी यावलला काही काळ वास्तव्य केल्याचे आणि महाभारताचे काही पर्व येथे लिहिल्याची दंतकथा आहे.प्राचीन काळात यावलच्या उत्तरेस असलेल्या सातपुड्याचे घनदाट जंगल भुसावळच्या तापी नदीपात्रापर्यंत असल्याचे सांगितले जाते.सध्याच्या येथील हाडकाई खडकाई नद्या म्हणजेच पूर्वीच्या हरिता -सरिता होत.या नद्यांच्या संगमानंतर सूर नदी ही दक्षिणवाहिनी आहे.शहराच्या बाहेर याच नदीच्या टेकडीवर लोमेश ऋषी राहत होते.एकदा लोमेशांनी महर्षी व्यासांच्या हातून यज्ञ करण्याचे ठरविले होते त्याच वेळेस अज्ञातवासातून हस्तीनापुराकडे परतत असलेल्या पांडवांनी यावल येथील लोमेशांचे आश्रमात काही काळ विसावा घेतला होता.परतीच्या प्रसंगी लोमेशांनी महर्षी व्यासांना पांडवांच्या हस्ते यज्ञांचे निमंत्रण दिले होते.त्यानुसार महर्षी व्यास येथे आले होते आणि त्यांचे हस्ते यज्ञ पार पाडला.त्यानंतर महर्षींनी काही काळ या परिसरात घालवला अशी दंतकथा आहे.महर्षींच्या वास्तव्य काळात महाभारताची काही पर्व येथे लिहिण्याचे सांगितले जाते.महर्षी व्यास हे सप्त चिरंजीवांपैकी एक आहेत.चिरंजीवी महर्षी व्यास आजही या भूमीत वावरत असल्याचे परिसरातील भाविकांची भावना आहे.महर्षी व्यासांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या या भूमीत व्यासांचे भव्य मंदिर असल्याने दरवर्षी येथे गुरुपौर्णिमेस मोठ्या यात्रेयात्रेचे आयोजन केले जाते. महर्षी व्यासांच्या दर्शनासाठी जिल्ह्यातील भाविक मोठ्या प्रमाणात येथे येतात आणि महर्षींच्या चरणी लीन होतात.
पौर्णिमेनिमित्ताने यावलला महापूजा
गुरु पौर्णिमेनिमित्ताने यावल येथील महर्षी व्यास मंदिरात सकाळी आठ वाजेला महापूजेचे आयोजन करण्यात आले असून ११ पासून महाप्रसाद वाटपास सुरुवात होईल.यानिमित्ताने मंदिर परिसरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून दिवसभर महाप्रसादाचे वाटप करणार आहेत.भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन महर्षी व्यास व श्रीराम मंदिर विश्वस्तांनी केले आहे.