लाखो रूपयांच्या आर्थिक घोटाळ्यात अडकलेल्या कालीका पतसंस्थेवर कारवाई न करणाऱ्या निबंधकाची तात्काळ बदली करण्याबाबत शिवसेनेची मागणी
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२५ जुलै २४ गुरुवार
येथील आर्थिक व्यवहारात वादग्रस्त असलेल्या कालीका नागरी पंतसंस्थेच्या कथित भ्रष्टाचाराच्या व्यवहाराला पाठीशी घालणाऱ्या सहाय्यक निबंधक यांची तात्काळ बदली करण्यात यावी अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा सहसंघटक नितिन सोनार यांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे नुकतीच केली आहे.
सदरहू शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा सहसंघटक नितिन श्रावण सोनार यांनी गौतम बलसानी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था जळगाव यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,अनेक आर्थिक व्यवहारात अफरातफर करणाऱ्या कालीका नागरी पत संस्था यावल या पतसंस्थेविरूद्ध अनेक तक्रारी असुन या संपुर्ण आर्थिक व्यवहारात सहभागी असल्याची जबाबदारी ही चेअरमन असलेले पंकज श्रावण सोनार यांच्यावर अंतिम निकालात निश्चित करण्यात आली आहे.तरी असे असतांना यावल येथील सहकारी संस्यांचे सहाय्यक निबंधक एस.एफ.गायकवाड हे संबंधीतांवर कारवाई न करता उडवाउडवीचे उत्तर देवुन कारवाई करण्यास टाळाटाळात करीत आहे.दरम्यान सहाय्यक निबंधक या कार्यालयाचे अधिकारी गायकवाड हे कधीही वेळेवर कार्यालयात मिळुन येत नाहीत ते आपल्या घरी बसुन कार्यालयीन कामकाज चालवत असल्याचे तक्रार निवेदनात म्हटले आहे तसेच त्यांना भ्रमणध्वनीवरून जाब विचारल्यास मला वेळ मिळेल तेव्हा मी काम करणार कुणीही माझे काही वाकडे करू शकत नाही असे उत्तर देतात.तरी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था गौतम बलसानी जळगाव यांनी तात्काळ निर्णय घेत यावल येथील निबंधक एस.एफ.गायकवाड यांची बदली करून निर्णय देण्याची श्रमता असलेल्या चांगल्या अधिकाऱ्याची नेमणुक यावल या ठीकाणी करावी अशी मागणी केली आहे.सदरहू तसे न झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करणार असल्याचे निवेदनात शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपसंघटक नितिन श्रावण सोनार यांनी म्हटले आहे.