जिल्हा परिषदेवर बकऱ्यांचा मोर्चा घेऊन जात “दप्तर घ्या बकऱ्या द्या”असे केले अनोखे आंदोलन
विद्यार्थ्यांच्या आंदोलनापुढे प्रशासन नमले,दरेवाडीतील बंद झालेली शाळा पुन्हा सुरू होणार!
नाशिक-पोलीस नायक(प्रतिनिधी)
सत्तेपुढे शहाणपण चालत नाही असे म्हणतात व त्यांच्यासमोर भलेभले हात टेकतात.असे असले तरी दरेवाडी गावच्या विद्यार्थ्यांनी ही व्याख्या कायमची बदलून टाकली आहे.विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनासमोर जिल्हा प्रशासनाला नमते घ्यावे लागले आहे.काल नाशिक मध्ये इगतपुरी तालुक्यातील दरेवाडी गावच्या जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या सुमारे ४० ते ४५ विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेवर बकऱ्या घेऊन जात दप्तर घ्या बकऱ्या द्या मोर्चा घेऊन जात अनोख आंदोलन केले होते सदरील विद्यार्थ्यांचे आंदोलन चांगलेच लक्षवेधी ठरले आहे.अतिदुर्गम भाग असलेल्या दरेवाडी येथील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सुरू असलेल्या लढ्याला अखेर यश आले आहे.जिल्हा प्रशासनाने या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची दखल घेतली असून दरेवाडीतील शाळा पुन्हा होणार सुरू होणार आहे.भाम धरणामुळे विस्थापित झालेल्या इगतपुरी येथील काळुस्ते गावच्या दरेवाडीची जिल्हा परिषद शाळा बंद केल्याने येथील विद्यार्थाना इतरत्र शाळेत हलविण्याचा निर्णय घेण्यात आला होता.विद्यार्थ्यांना शाळा दूर पडत असल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास होत होता यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतः लढा उभारला.शाळा नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होवू नये म्हणुन श्रमजीवी संघटनेच्या वतीने स्थानिक गटशिक्षण अधिकारी कार्यालयात देखील शाळा भरवून एक अनोखे आंदोलनही करण्यात आले होते.आमची शाळा बंद केल्याने आता बकऱ्या चारण्याशिवाय आमच्याकडे पर्याय उरला नाहीये अशी भूमिका आंदोलनावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी मांडली होती.मात्र त्यानंतरही शाळा बंद करण्यावर प्रशासन ठाम असल्याने विद्यार्थ्यांनी हा मोर्चा काढला.विद्यार्थ्यांनी आम्हाला शिकायचे नसून आम्ही दप्तर देण्यासाठी नाशिकला जात असून बकऱ्या घेणार आहोत अशी भूमिका ठामपणे मांडली.
काल झालेल्या अनोख्या आंदोलनानंतर विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश आले असून दरेवाडी येथील जिल्हा परिषदेची शाळा पुन्हा सुरू होणार आहे.जिल्हा परिषदेने आंदोलन करणाऱ्यांसोबत चर्चा करून बुधवारपासून पुन्हा पूर्वीप्रमाणेच दरेवाडी येथील जिल्हा परिषद शाळा सुरू करण्याच्या सूचना जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी भास्कर कनोज यांनी केले आहेत.इगतपुरीच्या दरेवाडीपासून ३०० मीटर अंतरावर हायस्कूल तर ८०० मीटरवर प्राथमिक शाळा आहे.धरणामुळे विस्थापित नागरी वस्त्यांचे पुनर्वसन केले आहे.काही कुटुंबांनी मात्र स्थलांतर होण्यास नकार दिला होता.दरेवाडीतील मुलांसाठी तात्पुरत्या स्वरुपात शिक्षकाची नेमणूक केली होती परंतु त्याठिकाणी शाळा मंजूर नाही.शाळा मंजुरीचे अधिकार शासनाला असल्याने त्यामुळे तूर्त विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून शिक्षक पाठविण्यात येणार आहे तसेच लवकरच दरेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेला भेट देणार असल्याचे शिक्षणाधिकारी भास्कर कनोज यांनी सांगितले आहे.