मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याचे तीव्र पडसाद उमटले असून मुख्यमंत्र्यांनी ही घटना योग्य पद्धतीने हाताळली नसल्याचीही चर्चा भाजपच्या केंद्रीय नेत्यांमध्ये होऊ लागली आहे याचा फटका शिंदे यांना बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे आत्तापर्यंत शिंदेंच्या पाठीशी असलेले भाजपचे केंद्रीय नेते निवडणुकीनंतरही कायम राहतील का याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपला फारसे यश न मिळाल्याने विधानसभा निवडणुकीची सूत्रे संघाने ताब्यात घेतल्याचे सांगितले जाते.मतदारसंघनिहाय संघ समन्वयक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली असून भाजपच्या निर्णयप्रक्रियेवर संघाच्या प्रतिनिधीकडून देखरेख ठेवली जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.संघाच्या सक्रियतेमुळे प्रदेश भाजपमधील सर्वोच्च नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अधिक महत्त्व प्राप्त होऊ लागले आहे.राज्यात निर्णयाचे सर्वाधिकारही फडणवीस यांना देण्यात आले आहेत.मध्यंतरी लोकसभा निवडणुकीनंतर उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा प्रस्ताव देऊन फडणवीस यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर दबाव वाढवल्याचे बोलले जात आहे.विधानसभेच्या २८८ जागांपैकी भाजप १५०-१६० जागा लढवण्याची शक्यता असून शिवसेनेच्या शिंदे गटाच्या वाट्याला ७०-८० जागा येऊ शकतात.अजित पवार गटाला जास्तीत जास्त ५० जागा मिळण्याची शक्यता आहे.उर्वरित ७-८ जागांवर छोट्या पक्षांना सामावून घेतले जाईल.जागावाटपाच्या या सूत्राचा आधार घेतल्यास भाजप सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरल्यास मुख्यमंत्रीपदावर दावा करू शकतो मात्र शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रीपद देऊन सरकारला स्थैर्य मिळवून देण्याची रणनीती भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने आखली होती.

शिंदे गटाला किमान ५० जागा जरी जिंकता आल्या तरी एकनाथ शिंदेंची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागू शकते असे सांगितले जात होते.आतापर्यंत भाजपला अजित पवार यांच्या राजकीय उपयुक्ततेबाबत फारशी आशा नव्हती मात्र शिवपुतळ्याच्या घटनेनंतर अजित पवार यांनी शिंदेंविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचे आहे.शिवाय विधानसभा निवडणुकीनिमित्ताने संघ कार्यरत झाल्यामुळे भाजपमधील पक्षांतर्गत नाराजीलाही तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.शिंदे यांच्याकडेच सत्तासूत्रे राहणार असतील तर आम्ही कष्ट कोणासाठी आणि का करायचे ? या भाजपतील निष्ठावंतांच्या प्रश्नाची तीव्रता वाढली असून त्याचीही गंभीर दखल भाजप श्रेष्ठींना घ्यावी लागत असल्याचे सांगितले जाते.ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२० मध्ये झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत जनता दलाचे (संयुक्त) प्रमुख नितीश कुमार यांना भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे आश्वासन दिले होते व त्या निवडणुकीत भाजपला ७४ आणि जनता दलाला ४३ जागा मिळाल्या असे असतांना ‘मोठा भाऊ’ असूनही भाजपने नितीशकुमार यांना मुख्यमंत्रीपदी बसवण्याचे औदार्य दाखवले व हाच मोठेपणा महाराष्ट्रात शिंदेंबाबतही दाखवण्याची तयारी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून केली जात असल्याचे सांगितले जाते.