मुंबई-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
शिवतीर्थावरील दसरा मेळावा आणि ऋतुजा लटके यांचा राजीनामा या दोन प्रकरणांवरुन झालेल्या राजकीय संघर्षात मुंबई महानगरपालिका सपशेल तोंडावर आपटली आहे.परंतु हीच बाब ठाकरे गटासाठी एकप्रकारची इष्टापत्ती ठरली आहे.यापूर्वी शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी मुंबई पालिकेने शिवसेनेला परवानगी नाकारली होती.परंतु न्यायालयाने पालिकेचा हा निर्णय फिरवत उद्धव ठाकरे यांना शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यास हिरवा कंदील दाखवला होता हा न्यायालयीन विजय ठाकरे गटासाठी एक मोठा भावनिक बुस्टर ठरला होता.या लहानशा विजयानंतर ठाकरे गटाचे कार्यकर्ते जोमाने कामाला लागले होते आणि त्यांनी या संधीचे अक्षरश: सोने केले होते.शिंदे गटाच्या आडकाठीमुळे दसरा मेळावा होणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला होता.बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून चालत आलेली अनेक वर्षांची परंपरा खंडित होणार की काय असे मोठे संकट उद्धव ठाकरे यांच्यासमोर उभे राहिले होते.परंतु उच्च न्यायालयाचा निर्णय आपल्या बाजूने आल्यानंतर ठाकरे गटाने या संकटाचे रुपांतर संधीत केले होते.
तसाच काहीसा प्रकार ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्याच्या प्रकरणानंतरही पाहायला मिळण्याची शक्यता आहे.ठाकरे गटाला मशाल ही नवी निशाणी मिळाल्यानंतर शिवसेनेकडून उद्धव बाळासाहेब ठाकरे गट अंधेरी पोटनिवडणुकीच्या निमित्ताने राजकीय हवा सातत्याने तापविली जात आहे.महापालिकेने शेवटच्या क्षणापर्यंत ऋतुजा लटके यांचा राजीनामा रोखून धरला आणि हे प्रकरण न्यायालयात गेले.उच्च न्यायालयाने ऋतुजा लटके यांच्या बाजूने निर्णय दिल्यानंतर पुन्हा एकदा ठाकरे गटाची सरशी झाली आहे.आतापर्यंत लटके यांचा राजीनामा रोखून ठाकरे गटाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जात होता.परंतु हायकोर्टाच्या निर्णयामुळे संपूर्ण चित्रच पालटले आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारनेच सगळ्या यंत्रणांचा वापर करून रमेश लटके यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांच्या मार्गात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला असा आरोप करत आगामी पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्याकडून निवडणूक जिकंण्याकरिता सर्व ताकद लावली जाण्याची शक्यता आहे.या माध्यमातून ठाकरे गटाकडून मतदारांना भावनिक सादही घातली जाईल.
कोर्टाच्या निर्णयामुळे आता ठाकरे गटाला नक्कीच आणखी स्फुरण चढेल यामुळे अंधेरी पोटनिवडणुकीच्या निमित्ताने सुरु असलेल्या भावनिक लढाईत ठाकरे गटाला फायदा मिळणार आहे.भावनिक मुद्द्यांचा प्रभावीपणे वापर करण्यात शिवसेनेचा हात कोणीही धरू शकत नाही हे सर्वश्रुत आहे.त्यामुळे ऋतुजा लटके यांचा आत्ताचा विजय हा अंधेरी पोटनिवडणुकीतील टर्निंग पॉईंट ठरण्याची शक्यता आहे. हायकोर्टातील लढाई जिंकल्यामुळे अंधेरी पोटनिवडणुकीच्या लढाईतील ‘मुव्हमेंटम’ एकप्रकारे ठाकरे गटाच्या बाजूने झुकले आहे.आता याचाच वापर करून ठाकरे गट अंधेरी पोटनिवडणुकीत बाजी मारू शकतो.