महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक अद्याप जाहीर झालेली नाही मात्र पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या हालचालींना वेग आल्याचा दावा गेल्या आठवड्यात केला होता.महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती निराशाजनक आहे.छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणे,बदलापुरात झालेली घटना यामुळे सरकारच्या कार्य पद्धतीवरच अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत व या नकारात्मक वातावरणातून सुटका करून घेण्यासाठी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली जाणार आहे.माजी मुख्यमंत्री म्हणाले,सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याचे प्रकरण,बदलापूरमधील चिमुकल्या मुलींवरील बलात्काराची घटना व राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नामुळे जनतेच्या मनात सरकारविषयी प्रचंड रोष आहे.पुतळ्यावरून तर राज्यभर संतप्त भावना उमटत आहेत.गेल्या शंभर वर्षांत देशात कधी पुतळा पडला नाही त्यामुळे जगभरातही उलट-सुलट चर्चा सुरु आहेत.भाजपाला निवडणुकीत याचे परिणाम भोगावे लागतील असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.