“केंद्रातील मोदी सरकार रशिया-युक्रेन युद्ध थांबविण्याच्या ‘दिवास्वप्ना’त मश्गूल आहे आणि इकडे मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचाराचा वणवा पेटला आहे.मागील दीड वर्षापासून म्यानमार सीमेवरील हे राज्य जातीय-वांशिक हिंसाचारात होरपळते आहे.आतापर्यंत या वणव्यात २०० पेक्षा जास्त लोकांचा जीव गेला आहे.भाजपाचे पुचकामी मुख्यमंत्री बीरेन सिंह आणि मणिपूर सोडून आसामला पळून जाणारे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांच्या ‘हवाली’ मणिपूरमधील जनतेला केंद्र सरकारने ढकलून दिले आहे.त्याची जबाबदारी आणि उत्तरदायित्व पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना झटकता येणार नाही.पुनःपुन्हा हिंसाचाराच्या वणव्यात होरपळणारे मणिपूर हे केंद्रातील मोदी सरकारच्या बेपर्वाईचेच पाप आहे” असे ठाकरे गटाने म्हटले आहे.”मणिपुरातील हिंसाचारग्रस्त भागाची जातीनुसार विभागणी झाली आहे हे सगळेच भयंकर आहे तरीही आपल्या पंतप्रधानांना मणिपूरपेक्षा रशिया-युक्रेन युद्धाची ‘काळजी’ लागून राहिली आहे.मणिपूरबाबत मात्र ते ‘निष्काळजी’ आहेत. रशिया-युक्रेन युद्ध थांबविण्यासाठी मोदी सरकारने रशियाला ‘फोन पॉइंट फॉर्म्युला’ दिला आहे पण मग मणिपूरचे काय ? मणिपूरमधील शांततेचा कुठलाच ‘फॉर्म्युला’ तुमच्याकडे नाही का ? आधी मणिपूरची आग विझवा आणि मग रशिया-युक्रेनमध्ये तुमच्या त्या फॉर्म्युल्याचे ‘बंब’ घेऊन जा” अशी टीकाही ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.