नागपूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१४ सप्टेंबर २४ शनिवार
भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडले मात्र अनेक महिन्यांनंतरही त्यांचा भाजपात अधिकृत प्रवेश झालेला नाही.दिल्लीश्वरांशी माझे बोलणे झालेले आहे असे खडसे यांनी लोकसभा निवडणुकीच्या आधी सांगितले होते मात्र राज्यातील नेत्यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केली नाही.आता एका वृत्तवाहिनीशी बोलताना एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत वेगळाच गौप्यस्फोट केला.“देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मुलीची शपथ घेऊन मला राज्यपालपदाची ऑफर दिली होती” असा दावा एकनाथ खडसे यांनी केला होता यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे.नागपूर विमानतळावर प्रसारमाध्यमांशी बोलत असताना देवेंद्र फडणवीसांना खडसेंच्या दाव्याबाबत प्रश्न विचारला गेला होता.यावर ते म्हणाले,“एकनाथ खडसेंचे विधान मी ऐकलेले नाही पण खडसेंच्या बाबतीत आमच्या केंद्रीय नेतृत्वाने निर्णय घेतलेला आहे तो निर्णय आम्हाला सर्वांना मान्य आहे.केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करून त्याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल.”
मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या शेतमालाला अधिक दर मिळावा म्हणून महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत याचीही माहिती देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिली.कच्च्या खाद्य तेलावर कुठलेही आयात शूल्क नव्हते व आता कच्च्या तेलावर २० टक्के आयात शूल्क आकारले जाणार आहे तर शूद्ध तेलावर असलेला १२.५ टक्के कर वाढवून ३२.५ टक्के इतका करण्यात आला आहे यामुळे महाराष्ट्रात पिकणाऱ्या सोयाबिनचे दर वाढणार आहेत याचा मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे तसेच सोयाबिन खरेदीचा निर्णयही केंद्र सरकारने घेतलेला आहे. यासोबतच कापूस पिकविणाऱ्या शेतकऱ्यांनाही याचा फायदा होणार आहे असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.गेल्या काही काळात कांद्याचा दराचा प्रश्न निर्माण झाला होता यावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारने किमान निर्यात किंमत पूर्णपणे काढून टाकली आहे तसेच निर्यात शूल्क ४० टक्क्यांवरून २० टक्क्यावर आणले आहे यामुळे कांद्याचे दर स्थिर होण्याकरिता मोठा दिलासा मिळणार आहे.कांदा उत्पादक शेतकऱ्यांची महत्त्वाची माहिती केंद्र सरकारने मान्य केली आहे.याबद्दल मी केंद्र सरकारचे मनापासून अभिनंदन व्यक्त करतो असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.अंदमान निकोबार बेटांची राजधानी पोर्ट ब्लेअरचे नाव बदलून आता ‘श्री विजयपुरम’ करण्यात आले आहे.या निर्णयाबाबत विचारले असता फडणवीस म्हणाले की,मी या निर्णयाचे स्वागत करतो.गुलामींच्या चिन्हांना हटविले गेले पाहीजे.गुलामीची चिन्ह हटविण्यासाठी मोदी सरकारने जे कार्य हाती घेतले आहे त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो.