Just another WordPress site

चिरनेर जंगल सत्याग्रहाचा ९४ वा हुतात्मा स्मुतीदिन उत्साहात साजरा !! पोलीसांनी बंदुकीच्या गोळ्या झाडून हुतात्म्यांना दिल्या शासकीय मानवंदना !!

विठ्ठल ममताबादे,पोलीस नायक

रायगड-जिल्हा (प्रतिनिधी) :-

दि.२५ सप्टेंबर २४ बुधवार

देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात २५ सप्टेंबर १९३० साली झालेल्या ऐतिहासिक चिरनेर जंगल सत्याग्रहाच्या ९४ वा स्मृती दिनाचा कार्यक्रम बुधवारी (दि. २५) खासदार श्रीरंग (आप्पा)बारणे यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी शासकीय इतमानाने पोलिसांनी बंदूकीच्या फैरी झाडून हुतात्म्यांना शासकीय मानवंदना देण्यात आली.देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात सविनय कायदेभंग आंदोलनाअंतर्गत देशभरात आंदोलने सुरु होती.इंग्रज भारत छोडोचा नारा देत देशभरात आंदोलनाचा भडका उडाला होता त्याचवेळी चिरनेर येथेही २५ सप्टेंबर १९३० साली जंगल सत्याग्रह आंदोलन सुरु करण्यात आले होते.

शांततामय रितीने सुरु असलेल्या जंगल सत्याग्रहात शेतकरी,आगरी,आदिवासी असे सुमारे दोन हजार आंदोलक सहभागी झाले होते यामध्ये २० ते २२ वयोगटातील युवकांचाच अधिक सहभाग होता.जंगल का कायदा तोड दिया,इंग्रज भारत छोडोचा नारा देत चिरनेर येथील आक्कादेवीच्या डोंगराकडे निघालेल्या आंदोलनकर्त्यांवर जुलमी ब्रिटिश पोलिसांनी निर्दयपणे बेछुट लाठीचार्ज,गोळीबार केला.या गोळीबारात धाकू गवत्या फोफेरकर,नाग्या महादेव कातकरी (चिरनेर),रामा बामा कोळी (मोठी जुई),हसुराम बुधाजी घरत (खोपटे),रघुनाथ मोरेश्वर न्हावी (कोप्रोली), परशुराम रामा पाटील (पाणदिवे),आनंदा माया पाटील (धाकटी जुई),आलु बेमट्या म्हात्रे (दिघोडे) या उरण तालुक्यातील आठ हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली तर अनेकजण जखमी झाले.स्वातंत्र्य लढ्यातील चिरनेर जंगल सत्याग्रहाचा हा लढा देशभरात प्रसिध्द आहे.या लढ्यात उरण तालुक्यातील धारातिर्थी पडलेल्या आठ हुतात्म्यांची स्मारके शासनाने परिसरातील त्यांच्या मुळगावी उभारली आहेत.स्वातंत्र्य संग्रामातील या महत्वाच्या लढ्यात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचे आणि स्वातंत्र्यासाठी दिलेल्या लढ्याचे सर्वांनाच स्मरण व्हावे आणि हुतात्म्यांच्या स्मृती कायम तेवत राहावी यासाठी दरवर्षी २५ सप्टेंबर रोजी चिरनेर येथे हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. शासकीय इतमानाने साजराही करण्यात येतो.बंदुकीच्या फैरी झाडून हुतात्म्यांना अभिवादन,मानवंदना दिली जाते.पुष्पचक्र वाहात हुतात्म्यांचे स्मरण केले जाते.

तसेच हुतात्म्यांच्या वारस,कुटुंबातील सदस्यांचा यथोचित सत्कार,सन्मान करण्यात येतो.ऐतिहासिक महत्व असलेल्या आणि स्वातंत्र संग्रामातील सुवर्ण पान म्हणून ओळखला जाणाऱ्या चिरनेर जंगल सत्याग्रहाचा स्मृती दिनाचा ९४ वा स्मृतीदिन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत बुधवारी (दि. २५) उत्साहात पार पडला.ठिक बारा वाजता पोलीसांनी बंदूकीच्या फैरी झाडून हुतात्म्यांना शासकीय मानवंदना दिली त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पचक्र वाहून हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी खासदार श्रीरंग बारणे,आमदार प्रशांत दादा ठाकूर,माजी आमदार बाळाराम पाटील,जिल्हा प्रमुख माजी आमदार मनोहर भोईर,काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत,उद्योजक पी पी खारपाटील, उद्योजक राजाशेठ खारपाटील,ईसीपी विशाल नेव्हुल,उद्योजक जे.एम.म्हात्रे,शेकापचे युवा नेते प्रितम म्हात्रे,उरण तहसीलदार डॉ.उध्दव कदम, कामगार नेते दिनेश पाटील,भुषण पाटील,रविंद्र पाटील,भाजपा जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी,भाजपा तालुकाध्यक्ष रवि शेठ भोईर, उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर,गटविकास अधिकारी समीर वाठारकर,उरण पो.नि.राजेंद्र मिसाळ,चिरनेर सरपंच भास्कर मोकल,उपसरपंच सचिन घबाडी,माजी जिल्हाध्यक्ष अतुल भगत,शेकापचे नारायण घरत,माजी सभापती नरेश घरत,मा उपसभापती शुभांगी सुरेश पाटील,मनसेचे जिल्हाध्यक्ष संदेश भाई ठाकूर,तालुका प्रमुख संतोष ठाकूर,सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार,मेधाताई आदी मान्यवर सह विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते,ग्रामस्थ, शासकीय अधिकारी उपस्थित होते.

हुतात्म्यांच्या त्यागातूनच स्वातंत्र्य मिळाले आहे व त्याचे स्मरण होणे तसेच या परिसराचे पवित्र राखणे आवश्यक आहे.या परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकसंघ होणे गरजेचे असल्याचे मत मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच भास्कर मोकल यांनी केले तर सूत्रसंचालन राजेंद्र भगत यांनी केले आहे.या कार्यक्रमाचे औचित्य साधून चिरनेर गावच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या पी पी खारपाटील कंपनीचे संचालक पी पी खारपाटील,राजाशेठ खारपाटील,समीर खार पाटील,सागर खार पाटील यांचा खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत नागरी सत्कार करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.