अखेरचा सलाम !! उदार अंत:करणाच्या उद्योजकाला निरोप !! वरळीतील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार !!
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१० ऑक्टोबर २४ गुरूवार
यशस्वी उद्योजकांचे उत्तम उदाहरण,परोपकार वृत्ती असणारे दयाळू व्यक्तीमत्त्व,प्राणीमात्रांवर पराकोटीचं प्रेम आणि माणसातलं माणूसपण जपणाऱ्या रतन टाटा अनंतात विलीन झाले.वरळीतील स्मशानभूमीत शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.रतन टाटा यांना अखेरचा निरोप देण्याकरता देशभरातील असंख्य लोक मुंबईत दाखल झाले होते.पारशी समाजाच्या विधीनुसार त्यांचावर अंत्यसंस्कार करण्यात आले. विद्युत स्मशानभूमीत त्यांनी अखेरचा निरोप दिला.
टाटा यांचे पार्थिव दक्षिण मुंबईतील नरिमन पॉइंट येथील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स (NCPA) येथे गुरुवारी सकाळी साडेदहा ते दुपारी चार या वेळेत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते त्यानंतर त्यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी वरळीतील स्मशानभूमीत नेण्यात आले.केंद्राच्या वतीने रतन टाटा यांच्या अंत्यसंस्काराला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित होते.अमित शहा,केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि इतर मंत्री आणि अंबानींसारखे उच्च उद्योजकही उपस्थित होते.
टाटा या नाममुद्रेच्या माध्यमातून भारतीय उद्योग जगताला आधुनिक युगात नेण्यासाठी झटणारे आणि या क्षेत्राचा ठसा आंतरराष्ट्रीय प्रतलावर उमटवणारे द्रष्टे उद्योगपती,दानवीर,टाटा उद्योसमुहाचे माजी अध्यक्ष रतन नवल टाटा यांचे बुधवारी रात्री मुंबईतील रुग्णालयात वृद्धापकाळाने निधन झाले.रतन टाटा गेले काही दिवस आजारी होते. आपल्या प्रकृतीस धोका नसल्याचे त्यांनी सोमवारीच समाजमाध्यमांवर जाहीर केले होते परंतु बुधवारी त्यांची प्रकृती खालावली आणि रात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली.त्यांच्या निधनाचं वृत्त समजातच समाजमाध्यमांवर अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेकांनी त्यांच्याप्रती शोक व्यक्त केला.
सामान्य नागरिकांसह अनेक दिग्गज लोकांनी रतन टाटांना अखेरचा निरोप देण्याकरता गर्दी केली होती. तसंच, त्यांच्या सावत्र आई सिमोन टाटा याही अंत्यसंस्कारावेळी उपस्थित होत्या.पंतप्रधान नरेंद्र मोदी आसियान-भारत आणि पूर्व आशिया शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी लाओसला गेले असल्याने ते यावेळी उपस्थित राहू शकले नाहीत.