नवरात्रोत्सवाची सांगता होताना तुळजाभवानी मंदिरात तुळजाभवानी मातेची निद्रा सुरू होते.कोजागरी पौर्णिमेला रात्री तुळजाभवानी मातेची निद्रा संपते.तेथे रात्रभर उत्सव असतो.कोजागरी पौर्णिमेच्या शीतल चांदण्यात तुळजाभवानी मातेचे दर्शन घेणे भाग्याचे असल्याची भाविकांची पारंपरिक श्रद्धा आहे.अलीकडे काही वर्षांपासून कोजागरी पौर्णिमेला तुळजापूरकडे जाणाऱ्या भाविकांची उच्चांकी गर्दी होताना दिसून येते.दूर दूरच्या गावावरून ऊन,वारा,पाऊस अंगावर झेलत तुळजापूरला पायी चालत तुळजाभवानी मातेचे दर्शन घेण्याची ही परंपरा नेमकी केव्हा सुरू झाली याचा इतिहास ज्ञात नाही.भाविकांची होणारी प्रचंड गर्दी विचारात घेऊन पोलीस प्रशासनाने तुळजापूरकडे जाणारे सर्व रस्ते वाहतुकीसाठी पूर्णतः बंद ठेवले आहेत.वाहन वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करण्यात आले आहेत.रस्त्यावर थोड्या थोड्या अंतरावर भाविकांसाठी अनेक सामाजिक स्वयंसेवी संस्थांनी चहा-पाणी,न्याहारी,प्रसादाची व्यवस्था केली आहे.जागोजागी भाविकांना फळांचे वाटप केले जात आहे. काही संस्थांनी भाविकांचा थकवा दूर करण्यासाठी अंग मालिश करण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेतली होती.वेदनाशामक औषधांचेही वाटप केले जात आहे तर काही संस्थांनी तात्पुरत्या स्वरूपात विश्रांतीची व्यवस्थाही केली आहे.