मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
शिवसेनेचे दिवंगत नेते आमदार रमेश लटके यांच्या अकाली निधनानंतर रिक्त असलेल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गट आणि भाजपमध्ये जोरदार लढाई पाहायला मिळणार आहे.ठाकरे गटाकडून रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके आणि भाजपकडून मुरजी पटेल यांनी आपले अर्ज आज दाखल केले आहे.यानंतर ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांनी या निवडणुकीत आम्हीच विजयी होऊ असे म्हणत थेट आकडेवारीच मांडली आहे.प्रसारमाध्यमांशी बोलताना वायकर म्हणाले अंधेरी पूर्व हा मतदारसंघ यापूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला होता.त्यानंतर शिवसेना प्रबळ झाली.आता ३१% टक्के मते शिवसेनेची त्यानंतर २८% मते काँग्रेसची आहेत आणि २५% मते भाजपची आहेत त्यानंतर राहिलेली थोडीफार मते मनसेची आहेत त्यामुळे ६५% मते एका बाजूला असून आमचा विजय निश्चित होणार असे असा दावा त्यांनी केला आहे.
दरम्यान २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मुरजी पटेल यांनी दिवंगत रमेश लटके यांना कडवे आव्हान दिले होते.शिवसेना-भाजप युतीत ही जागा शिवसेनेकडे होती त्यावेळी रमेश लटके यांना ६२ हजार ७७३ मते मिळाली तर अपक्ष लढलेल्या मुरजी पटेल यांना ४५ हजार ८०८ मते मिळाली होती.मुरजी पटेल यांना तेव्हाही भाजपने अंतर्गत पाठिंबा दिला होता अशा चर्चा सुरु होत्या.तर त्यावेळी काँग्रेस उमेदवाराला अवघी २८ हजार मते मिळाली होती.यंदा महाविकास आघाडी एकत्र असल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मते ठाकरे गटाला मिळण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे भाजपच्या साथीला शिंदे गट आणि आठवलेंचा गट असेल अशात आमची बाजू आणखीनच भक्कम झाली असल्याचे ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांनी म्हटले आहे.