मुद्रा लोनच्या नावाखाली सातशे महिलांना २५ लाखांस गंडविले !! सोलापुरात भामट्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल !!
सोलापूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२१ ऑक्टोबर २४ सोमवार
सामान्य महिलांना लघु उद्योगांसाठी केंद्र सरकारच्या मुद्रा लोन योजनेतून बिनव्याजी कर्ज प्रकरणे मंजूर करून देण्याचे आमिष दाखवून एका महिलेने ७०० पेक्षा अधिक महिलांची सुमारे २५ लाखांची फसवणूक केल्याची घटना उजेडात आली आहे.यासंदर्भात फसवणूक झालेल्यांपैकी शुभांगी धनंजय गायकवाड (वय ४२,रा.श्रीराम समर्थ पतंजली,जुळे सोलापूर) या लघुउद्योजक महिलेने फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार ज्योती रमेश कांबळे (रा.तळे हिप्परगा,सोलापूर) या महिलेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.१ जानेवारी २०२४ ते ३० सप्टेंबर २०२४ या कालावधीत हा प्रकार घडला.महिलांना फसविण्यासाठी ज्योती कांबळे हिने काही राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत महिलांचा मेळावा घेऊन त्यात प्रातिनिधिक स्वरूपात एका महिलेला मुद्रा लोन योजनेतून एक लाखाच्या कर्जाचा धनादेश प्रदान केला होता व तिने विश्वास संपादन करून सातशेपेक्षा अधिक महिलांना गंडविल्याचे दिसून आले.
शुभांगी गायकवाड व अर्चना पवार या दोघी काळा मसाला तयार करण्याचा लघुउद्योग चालवितात.त्यांना ओळखीच्या माध्यमातून ज्योती कांबळे हिने गाठले आणि लघुउद्योगासाठी केंद्र सरकारच्या मुद्रा लोन योजनेतून प्रत्येकी एक लाख रुपये कर्ज प्रकरणे मंजूर करून देण्याचे आमिष दाखविले.एक लाखाच्या कर्जातून २५ हजार रुपयांचे अनुदान मिळते म्हणजे ७५ हजार रुपयांचे कर्ज बिनव्याजी फेडता येते अशी ही योजना असल्याचे ज्योती कांबळे हिने समजावून सांगितले.त्यासाठी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लाभार्थी महिलेच्या नावाने बचत खाते उघडावे लागते आणि कर्ज मंजुरीच्या प्रक्रियेसाठी प्रत्येकी ३५०० रुपये द्यावे लागतात अशी माहिती देऊन तिने शुभांगी गायकवाड व इतरांचा विश्वास संपादन केला व त्यांच्या ओळखीच्या इतर ९० महिलांकडूनही ज्योती कांबळे हिने प्रत्येकी चार हजार रुपये उकळले.हा सर्व व्यवहार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रधान कार्यालयाजवळ होत होता.तिने आपला प्रभाव पाडण्यासाठी इच्छुक लाभार्थी महिलांना जिल्हा उद्योग केंद्रातही बोलावून घेतले होते.पुढे ज्योती कांबळे हिने शिवछत्रपती रंगभवनाजवळील समाज कल्याण केंद्राच्या सभागृहात सामाजिक कार्यकर्त्या छाया वाघमारे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल आणि माजी महापौर महेश कोठे यांच्या प्रमुख उपस्थितीत महिलांचा मेळावा आयोजिला होता.त्यावेळी एका महिलेला मुद्रा लोन योजनेतून एक लाखाचे कर्ज मंजूर झाल्याचे सांगत त्याप्रमाणे रकमेचा धनादेश दिला होता.हा धनादेश खरा होता की खोटा हे समजले नाही.नंतर मात्र ज्योती कांबळे हिने कबूल केल्याप्रमाणे मुद्रा लोन योजनेचा लाभ मिळवून देण्यास टाळाटाळ केली.शेवटी हा फसवणुकीचा प्रकार लक्षात आल्यानंतर तिच्याविरुद्ध पोलिसांत धाव घेण्यात आली.