मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२२ ऑक्टोबर २४ मंगळवार
राज्यात विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला असून सर्वच नेत्यांकडून बैठकांचा धडाका सुरु आहे.महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जागावाटपासंदर्भात चर्चा सुरु आहे.दुसरीकडे महायुतीमधील भारतीय जनता पक्षाने ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.आज महाविकास आघाडीच्या उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे तसेच शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाची उमेदवारांची यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे यातच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील सोमवारी दोन उमेदवारांच्या नावाची घोषणा केली तसेच मनसेच्या उमेदवारांचीही यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे.दरम्यान विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी आजपासून सुरुवात झाली आहे त्यामुळे राजकारण तापण्याची शक्यता असून राज्यातील सर्व घडामोडींसह राजकीय घडामोडींवर आपले लक्ष असणार आहे.
राज्यात विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला असून विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत.आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून २९ ऑक्टोबर या दिवसांपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत.
महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जागा वाटपासंदर्भात चर्चा सुरु आहे.शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये जागावाटपारून मतभेद असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.या पार्श्वभूमीवरच शरद पवार,उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये बैठकांवर बैठका सुरु आहेत.आज महाविकास आघाडीची उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.