शिंदेंच्या शिवसेनेत घराणेशाही !! नेत्यांचे कुटुंबीय विधानसभेच्या रिंगणात !! मुले,भाऊ व पत्नीला उमेदवारी !!
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२३ ऑक्टोबर २४ बुधवार
शिवसेनेने (शिंदे) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून या यादीत एकूण ४५ नावे आहेत.मंत्री दादा भुसे,गुलाबराव पाटील,उदय सामंत यांच्यासह स्वतःचीही उमेदवारी एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहे.महायुतीचे जागावाटप जवळपास पूर्ण झाले असल्याचा दावा महायुतीमधील नेते करत आहेत.भाजपा व शिवसेनेने त्यांच्या उमेदवारांच्या पहिल्या याद्या प्रसिद्ध केल्या आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने (अजित पवार) १८ उमेदवारांना एबी फॉर्म दिले आहेत.महाविकास आघाडी मात्र या बाबतीत मागे राहिली आहे.दरम्यान राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए-महाराष्ट्रात महायुती) नेते विरोधी पक्षांवर सातत्याने घाराणेशाहीचे आरोप करत असतानाच भाजपासह त्यांच्या मित्रपक्षांमध्ये देखील घराणेशाही पाहायला मिळत आहे.एकनाथ शिंदेंच्या पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी ४५ उमेदवारांची घोषणा केली असून यामध्ये अनेक असे चेहरे आहेत ज्यांचे वडील,पती अथवा भाऊ विद्यमान आमदार किंवा माजी मंत्री आहेत.एकनाथ शिंदेंच्या पक्षाने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत घराणेशाही पाहायला मिळत आहे.या पक्षाने अनेक मतदारसंघांमध्ये नव्या व तरुण उमेदवारांऐवजी प्रस्थापित नेत्यांच्या नातेवाईकांना विधानसभेचे तिकीट दिले आहे.एरंडोल,दर्यापूर,पैठण,जोगेश्वरी पूर्व,राजापूर व खानापूर मतदारसंघातून प्रस्थापित नेत्यांचे नातेवाईक निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर विधानसभा मतदारसघातून शिवसेना (शिंदे) नेते आनंदराव अडसूळ यांचे पुत्र अभिजीत अडसूळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर एरंडोल मधून अमोल चिमणराव पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.माजी मंत्री संदीपान भुमरे हे आता छत्रपती संभाजीनगरचे (औरंगाबाद) खासदार झाले आहेत त्यामुळे त्यांचा बालेकिल्ला असलेल्या पैठण विधानसभा मतदारसंघातून त्यांच्या मुलाला म्हणजेच विलास भुमरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. सांगलीच्या खानापूरमधून अनिल बाबर यांचे पूत्र सुहास बाबर यांना विधानसभेचे तिकीट देण्यात आले आहे.शिंदेंच्या पक्षात मुंबईतही घराणेशाही पाहायला मिळत आहे. माजी मंत्री रवींद्र वायकर हे आता वायव्य मुंबईचे खासदार झाले आहेत त्यामुळे त्यांच्या विधानसभा मतदारसंघातून म्हणजेच जोगेश्वरी पूर्वमधून त्यांच्या पत्नीला म्हणजेच मनिषा वायकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.या मतदारसंघासाठी भाजपा व शिवसेनेत (शिंदे) बरीच घासाघीस झाली अखेर शिंदेंनी मात्र या जागेवरील दावा सोडला नाही त्यामुळे जागावाटपात ही जागा शिंदेंच्या शिवसेनेला सुटली आणि त्यांनी येथून वायकरांच्या पत्नीला विधानसभेच्या रिंगणात उतरवले आहे.
शिवसेनेने मंत्री उदय सामंत यांना रत्नागिरीतून तर त्यांच्या भावाला म्हणजेच किरण सामंत यांना राजापूरमधून विधानसभेचं तिकीट दिले आहे.दरम्यान दापोलीमधून शिवसेनेने (शिंदे) पुन्हा एकदा आमदार योगेश कदम यांना उमेदवारी दिली आहे.योगेश कदम यांचे वडील रामदास कदम हे पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत.