मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.२९ ऑक्टोबर २४ मंगळवार

“माझ्याबरोबर येणाऱ्या कोणत्याही आमदाराचे तिकीट कापणार नाही,सर्वांना उमेदवारी देणार आणि निवडून आणण्याची जबाबदारी माझी असा शब्द एकनाथ शिंदेंनी मला दिला होता.ते एवढे मोठे नेते आहेत त्यांनी त्यांचा शब्द पाळायला पाहीजे होता.मी प्रामाणिकपणे काम केले त्याचे मला हे फळ मिळाले काय ? मी कधीही छक्के-पंजे खेळले नाहीत.मी प्रमाणिकपणे लोकांचे काम केले त्याचे हे फळ मिळाले का ?” अशा भावना व्यक्त करत पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाने उमेदवारी नाकारल्यानंतर वनगा नैराश्याच गेल्याचे त्यांच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे.काल सायंकाळी त्यांनी माध्यमांशी बोलत असताना आपली नाराजी व्यक्त केली तसेच उद्धव ठाकरेंचा पक्ष सोडून आपण चूक केली असेही बोलून दाखवले.माध्यमांशी बोलत असताना श्रीनिवास वनगा हे ढसाढसा रडताना दिसले.या जगात प्रामाणिक लोक कुणालाच नको आहेत.चोरी-लबाडी करणाले लोक सर्वांना प्रिय झालेत.माझी उमेदवारी नाकारल्यानंतर कुणाचाही फोन आलेला नाही.मला डहाणूमधून उमेदवारी देतो असा शब्द दिला गेला पण तिथूनही मला तिकीट दिलेले नाही.राजकारणात शब्द पाळणारे फार मोजके लोक असतात.नरेश मस्के,श्रीकांत शिंदे,रवींद्र फाटक यांनी प्लॅनिंग करून माझे तिकीट कापले आहे असा आरोपही वनगा यांनी यावेळी केला.त्यांना प्रामाणिक माणूस नको आहे,लबाडी-चोरी करणारा माणूस त्यांना प्रिय आहे.

मी आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना धन्यवाद देतो त्यांच्यामुळेच मी आमदार झालो.त्या देवमाणसाची मला आज माफी मागायची आहे मी चुकलो असे सांगताच श्रीनिवास वनगा ढसाढसा रडायला लागले.श्रीनिवास वनगा यांच्या रडतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते,विधानपरिषदेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी त्यांच्या पत्नीला फोन करून त्यांच्याशी संवाद साधला तसेच विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही फोन करून त्यांची चौकशी केली.पालघर विधानसभेसाठी श्रीनिवास वनगा यांच्या ऐवजी माजी खासदार राजेंद्र गावित यांना संधी देण्यात आली आहे.श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी नाकारताना निवडून येण्याची क्षमता नसल्याचे तसेच सर्वेक्षणात नकारात्मक निकाल मिळाल्याचे त्यांना पक्षाच्या वरिष्ठ मंडळींकडून सांगण्यात आले होते अशावेळी भाजपामधून शिवसेना (शिंदे) पक्षात प्रवेश देऊन गावीत त्याला उमेदवारी देण्यात आली.राजेंद्र गावित यांना पक्षप्रवेश देण्यापूर्वी श्रीनिवास वनगा यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत दोन दिवसांपूर्वी प्रदीर्घ चर्चा झाली होती त्यावेळी डहाणू मतदार संघात भाजपातर्फे उमेदवारी देण्याचे त्यांना आश्वासन देण्यात आले होते मात्र डहाणूची उमेदवारी भाजपाने विनोद मेढा यांना दिल्यानंतर श्रीनिवास वनगा यांच्या भावनांचा बांध फुटला.