शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाने सोमवारी १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली व या यादीमध्ये चक्क भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्या शायना एनसी यांच्या नावाचा समावेश करण्यात आला.शायना एनसी यांना पक्षाने मुंबादेवी मतदारसंघातून उमेदवारी दिली.वास्तविक गेल्या काही दिवसांपासून शायना एनसी या वरळी मतदार संघातून उमेदवारीसाठी इच्छुक होत्या.वरळीतून शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाने आदित्य ठाकरेंना उमेदवारी दिली आहे मात्र जागावाटपात वरळी मतदारसंघ शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या वाट्याला आल्यामुळे तिथून मिलिंद देवरा यांची उमेदवारी जाहीर झाली.दुसरीकडे मुंबादेवी हा मतदारसंघदेखील शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्याच यादीत समाविष्ट आहे.मिलिंद देवरांच्या उमेदवारीमुळे शायना एनसी यांच्या उमेदवारीबाबत संभ्रम निर्माण झाला व शेवटी सोमवारी रात्री शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाची यादी जाहीर झाल्यानंतर हा संभ्रम दूर झाला.रात्री उमेदवार याद्या जाहीर झाल्यानंतर आज दुपारी दीडच्या सुमारास शायना एनसी यांनी शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षात प्रवेश केला व आता त्या पक्षाच्या मुंबादेवीमधून अधिकृत उमेदवार असतील.शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षात प्रवेश केल्यानंतर शायना एनसी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे त्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत तसेच आपल्या माहायुतीने मला मुंबादेवीच्या नागरिकांची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी आभारी आहे असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.