पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,भारती ही पदवीचे शिक्षण घेत होती व त्याच महाविद्यालयात सचिन घरात (२६,रा.डोंगरताल,ता.रामटेक) हा शिकत होता.भारतीला बघताच सचिन तिच्या प्रेमात पडला व त्याने एका मैत्रिणीच्या माध्यमातून भारतीचा मोबाईल नंबर मिळवला व तिची ओळख करुन घेतली व दोघांची काही दिवसांतच घट्ट मैत्री झाली आणि दोघांचे प्रेमसंबंध निर्माण झाले.दोघांनीही प्रेमविवाह करण्याचा निर्णय घेतला.पदवी पूर्ण होताच सचिनची निवड भारतीय सैन्य दलात झाली त्यामुळे त्यांच्या प्रेमविवाहाला दोन्ही कुटुंबीयांनी सहमती दर्शविली.२०२२ मध्ये दोघांनी मोठ्या थाटात प्रेमविवाह केला दोन वर्षे संसार व्यवस्थित सुरू होता.भारतीच्या मैत्रिणीशी सचिनची ओळख झाली.विवाहित असतानाही त्याने तिच्याशी प्रेमसंबंध प्रस्थापित केले व तीसुद्धा त्याच्या प्रेमात पडली आणि दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला मात्र आता पत्नी भारती दोघांमध्ये काटा होती त्यामुळे पत्नीला रस्त्यावरुन हटविल्याशिवाय लग्न होणार नव्हते त्यामुळे त्याने साथिदार भूनेश्वर गजबे (१९),राहुल चौके (२२) आणि सैन्य दलातील सहकारी नरेंद्र दोडके यांची मदत घेतली व भारतीचा खून करण्याचा कट रचला.

घटस्फोट देण्यास नकार देणाऱ्या भारतीला फिरायला नेण्याच्या बहाण्याने कारमध्ये सोबत घेतले.कारमध्ये आधीच भूनेश्वर गजबे,राहुल चौके आणि नरेंद्र दोडके हे तिघे होते.दरम्यान सचिनने पत्नाचा गळा आवळून खून केला व भारतीच्या अंगावरील कपडे काढले तसेच तिचा नग्नावस्थेतील मृतदेह मध्यप्रदेशातील बेडाघाट परिसरातून वाहणाऱ्या नर्मदा नदीत फेकून पळ काढला.दरम्यान भारती बेपत्ता असल्याची तक्रार आई निर्मला नारनवरे यांनी दिली.ठाणेदार आसाराम शेटे यांनी भारतीच्या मोबाईलचा तांत्रिक तपास केला असता भूनेश्वरची माहिती समोर आली व त्याला ताब्यात घेऊन खाक्या दाखवताच त्याने भारतीचा खून केल्याची कबुली दिली.लगेच दुसरा आरोपी राहुल चौके याला अटक केली त्याने मृतदेह नदीत फेकल्याचे सांगितले.पोलिसांनी नदीतून मृतदेह बाहेर काढून ओळख पटवली.सैन्य दलात असलेला पती सचिन घरात आणि नरेंद्र दोडके यांना अटक करण्यासाठी पथक रवाना केले असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.