“लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी काँग्रेसच्या रॅलीत दिसल्या तर..” !! भाजपा खासदार धनंजय महाडिकांचे वादग्रस्त विधान !!
कोल्हापूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१० नोव्हेंबर २४ रविवार
राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधुम सुरु असून २० नोव्हेंबर रोजी मतदान आणि २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे त्यामुळे या निवडणुकीकडे देशाचे लक्ष लागलेले आहे व या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी मुख्य लढत पारायला मिळणार आहे.सध्या विविध मतदारसंघात दिग्गज नेत्यांच्या प्रचार सभा पार पडत आहेत.या सभेच्या माध्यमातून आपल्या उमेदवारांना निवडून देण्यासाठी नेते जनतेला आवाहन करत असल्याचे पाहायला मिळत आहे.या बरोबरच प्रचार सभांमधून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोपही सुरु आहेत.यातच महायुती सरकारने आणलेल्या लाडकी बहीण योजनेची राज्यात मोठी चर्चा आहे मात्र ऐन निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे खासदार धनंजय महाडीक यांनी केलेल्या एका विधानामुळे वाद रंगण्याची चिन्ह आहेत.‘लाडकी बहीण योजनेचे १५०० रुपये पैसे घेणाऱ्या महिला काँग्रेसच्या रॅलीत दिसल्या तर महिलांचे फोटो काढून पाठवा आम्ही त्यांची व्यवस्था करतो’ असे विधान धनंजय महाडिक यांनी कोल्हापुरातील एका सभेत बोलताना केला आहे.त्यांच्या या विधानानंतर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे.
“जर या ठिकाणी काँग्रेस पक्षाची रॅली निघाली आणि त्यामध्ये जर तुम्हाला महिला दिसल्या,ज्या महिला १५०० रुपये आपल्या योजनेचे घेतात त्यांचे फोटो काढून घ्या आणि नावे लिहून घ्या.म्हणजे घ्यायचे आपल्या शासनाचे आणि गायचे त्यांचे असे चालणार नाही.अनेक ताया महाराष्ट्रात छाती बडवत आहेत.आम्हाला पैसे नकोत,आम्हाला सुरक्षा पाहिजे असे म्हणतात.मग पैसे नकोत का ? या पैशांचे राजकारण करता ? आता काँग्रेसच्या सभेला जर महिला दिसल्या तर जाऊन फोटो काढायचे.काँग्रेसच्या रॅलीमध्ये महिला दिसल्या तर जाऊन फोटो काढायचे आणि आमच्याकडे द्यायचे,आम्ही त्यांची व्यवस्था करतो.जर कोणी मोठ्याने भाषण करायला लागली तर एक फॉर्म द्यायचा आणि या फॉर्मवर सही कर म्हणायचे.नको आहेत ना पैसे.लगेच उद्यापासून बंद करतो म्हणायचे.लगेच बंद,आमच्याकडेही पैसे जास्त झाले नाहीत” असे विधान खासदार धनंजय महाडिक यांनी केले आहे.
खासदार धनंजय महाडीक यांनी लाडकी बहीण योजनेवरून केलेल्या विधानाचा व्हिडीओ ट्वीट राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाकडून एक्सवर पोस्ट करण्यात आला आहे व त्यामुळे आता राजकारण तापण्याची शक्यता आहे.पोस्टमध्ये म्हटले आहे की,“दुश्मनाच्या सुनेलाही ज्यांनी बहिणीचा मान दिला.साडीचोळी देऊन सन्मान केला त्याच शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रात…माता भगिनींचा बंदोबस्त करतो म्हणणाऱ्या भाजपा खासदाराने फक्त राज्यातील माता-भगिनींचाच नव्हे तर माता जिजाऊ,माता सावित्री, माता अहिल्यादेवी या आपल्या आदर्शांचाही अपमान केला आहे.महाराष्ट्र हे विसरणार नाही” असे पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.