भंडारा-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
राज्यामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण काही कमी होताना दिसत नाही आहे.त्यात भंडारा जिल्ह्यात अशीच एक हादरवून टाकणारी घटना उघडकीस आली आहे.यामध्ये झोपेत असलेल्या पती-पत्नीची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे.ही घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील गोबरवाही या ठिकाणी घडली आहे.घरात झोपलेले असतानाच दोघांची गळा चिरून निर्घृणपणे हत्या करण्यात आली.सुशील बोरकर आणि सरिता बोरकर अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत.सदरील घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की,दि.१३ गुरुवार रोजी रात्री बोरकर कुटुंब झोपी गेले होते.सदरील दोघेही पती-पत्नी एकाच खोलीत झोपले होते तर शेजारच्या दुसऱ्या खोलीत त्यांची दोन मुले झोपली होती याचदरम्यान हि धक्कादायक घटना घडली आहे.दि.१४ शुक्रवारी रोजी सकाळी या दोघांनी बराच वेळ घराचा दरवाजा न उघडल्याने शेजाऱ्यांना संशय आला.यावेळी शेजाऱ्यांनी घराचा दरवाजा उघडला असता पती-पत्नी मृतावस्थेत पडलेले आढळून आले.यानंतर शेजारच्यांनी गोबरवाही पोलिसांना या घटनेची माहिती दिली.यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा करण्याची कारवाई पोलिसांनी पूर्ण केली आहे.सदरील खून कशासाठी करण्यात आला असावा ?याबाबत तर्क वितर्क लढविले जात आहे.सदरील खुनाबाबतची कसून चौकशी गोबरवाही पोलिसांकडून सुरु आहे.