“मोरारजी देसाईंनंतर राज ठाकरेच आहेत ज्यांना दोन्ही राज्यांचे नेतृत्व करायचे आहे” !! संजय राऊतांची बोचरी टीका
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१२ नोव्हेंबर २४ मंगळवार
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे पक्षस्थापनेपासून किंबहुना त्याआधी शिवसेनेत होते तेव्हापासून सातत्याने मराठी माणूस,मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर राजकारण करत आले आहेत.मात्र त्यांच्या या भूमिकेवर शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी शंका उपस्थित केली असून राज ठाकरे देखील गुजराती व्यापारी व नेत्यांच्या बाजूने उभे असल्याची टीका राऊत यांनी केली.महाराष्ट्राबद्दल,मराठी अस्मितेबद्दल राज ठाकरे जे काही बोलतात त्याला काही किंमत नाही,मोरारजी देसाईं नंतर राज ठाकरेच आहेत ज्यांना दोन्ही राज्यांचे नेतृत्व करायचे आहे अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी केली आहे.शिवसेना (ठाकरे) खासदार म्हणाले,राज ठाकरे काय वक्तव्ये करतात याला महाराष्ट्रात आता किंमत नाही.मोरारजी देसाई यांच्यानंतर गुजरात आणि महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची त्यांची इच्छा आहे.महाराष्ट्रात त्यांच्या पक्षाला फार स्थान आहे असे वाटत नाही.मोरारजी देसाईं नंतर आता राज ठाकरेच आहेत असे त्यांना वाटते.मराठी अस्मितेबद्दल त्यांच्या मनात काय आहे याबाबतची शंका कायम आमच्या मनात राहील.उद्धव ठाकरे हे महाराष्ट्र स्वाभिमानाचा व अस्मितेचा प्रचार करत आहेत.शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख व शरद पवार यांची लढाई महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आहे व त्यात जनता त्यांच्याबरोबर आहे.
संजय राऊत म्हणाले,गुजरातच्या दोन व्यापाऱ्यांनी महाराष्ट्राची लूट चालवली आहे आणि हे (राज ठाकरे) महाशय त्यांच्या बाजूने उभे आहेत.त्यांच्या वागण्यामुळे व त्यांची कृती पाहून आम्हाला मोरारजी देसाई यांची आठवण झाली हे दुर्दैव आहे.राज ठाकरे हे महान नेते आहेत,मला त्यांच्याबद्दल बोलायचे नाही.उद्धव ठाकरे यांच्यावर बोलताना त्यांनी भान ठेवावे ते शिवसेनेचे (उबाठा) पक्षप्रमुख आहेत.उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची लढाई महाराष्ट्रावर डल्ला मारणाऱ्या गुजरातच्या व्यापाऱ्यां विरोधात आहे.विक्रोळीत राज ठाकरे यांना वारंवार सभा घ्यावी लागत असेल तर त्यांचा पक्ष इथे कमकुवात आहे हे सिद्ध होत आहे.या मतदारसंघात केवळ सुनील राऊतच निवडून येणार असे त्यांनी नमूद केले.